गावठी पिस्तूल बाळगून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला बारामती शहर पोलिसांनी केली अटक
बारामती: बारामती नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आचारसंहिता लागू आहे. अशातच बारामती शहरात बेकायदेशीरपणे गावठी पिस्तूल बाळगून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला बारामती शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास, कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी दिला आहे.
प्रदीप सुरेश नकाते (वय २७, रा. प्रगतीनगर, बारामती) असं या आरोपीचं नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, दि. २८ नोव्हेंबर रोजी गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सतीश राऊत, पोलिस अंमलदार अमीर शेख, दत्तात्रय मदने व इतर पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी जनहित प्रतिष्ठान शाळेजवळ एकजण बेकायदेशीर शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी याबाबत पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांना माहिती दिली असता त्यांनी तात्काळ कारवाईच्या सूचना दिल्या.
त्यानुसार या पथकाने जनहित प्रतिष्ठान शाळेजवळ सापळा रचून संबंधित संशयिताला ताब्यात घेतले. त्याचे नाव प्रदीप नकाते असं असल्याचं समोर आलं असून त्याच्याकडे झडती घेतली असता एक गावठी पिस्तूल, चार जीवंत काडतुस आणि मॅगझिन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्याच्यावर बारामती शहर पोलिस ठाण्यात शस्त्र कायदा १९५९ कलम ३ (२५), भारतीय न्याय संहिता कलम ३ (५), मुंबई पोलीस अधिनियम १९५१ कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या आरोपीला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याने हे पिस्तूल कुठून आणले याची माहिती पोलिसांना दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संबंधित पुरवठादाराचा शोध सुरू केला आहे. बारामतीत आणखी कुणी अशा पद्धतीने शस्त्र बाळगत आहे का याचीही माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सतीश राऊत हे करत आहेत.
बारामतीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा दक्ष आहे. त्यामुळं कोणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा बेकायदा शस्त्र बाळगत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी दिला आहे. तसेच कोणी अशा प्रकारे दहशत निर्माण करत असेल, तर त्याबाबत बारामती शहर पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.