विरोधी पक्षनेत्याशिवाय पार पडणार हिवाळी अधिवेशन? काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

विरोधी पक्षनेत्याशिवाय पार पडणार हिवाळी अधिवेशन? काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

 

मुंबई: आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. मात्र यंदा प्रथमच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहाचं कामकाज विरोधी पक्षनेत्यांशिवाय चालणार आहे. विधिमंडळाच्या कामकाज पत्रिकेमध्ये विरोधी पक्षनेता निवडी संदर्भात कुठलाही उल्लेख नाही. दरम्यान विधान परिषदेमध्ये काँग्रेसकडून सतेज पाटील आणि विधानसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांच्या नावाचं पत्र देण्यात आलं आहे. मात्र विरोधी पक्षनेता निवडण्यात आलेला नाही. त्यामुळे हिवाळी अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवायच पार पडणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

सात दिवस चालणार अधिवेशन

हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबर ते १४ डिसेंबर अशा सात दिवसांसाठी चालणार आहे. यावेळी हिवाळी अधिवेशनात शनिवार आणि रविवारही कामकाज चालणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या मांडल्या जातील. शासकीय कामकाज होईल. त्यानंतर शोकप्रस्ताव मांडला जाईल. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं जाण्याची शक्यता आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे या निवडणुकांचा प्रभाव पुरवणी मागण्यांवरती पडणार का?, पुरवणी मागण्यासंदर्भात काही नवीन घोषणा होते का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

विरोधी पक्षनेत्याच्या निवडीबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री?

महाराष्ट्रात दोन्ही सभागृहांना विरोधीपक्ष नेता नाही याबाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. “विरोधीपक्ष नेत्यांचा निर्णय हा सर्वस्वी अध्यक्ष आणि सभापतींच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे त्यासंदर्भात जो निर्णय अध्यक्ष आणि सभापती घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. त्याबाबत आमचा कुठलाही आग्रह आणि दुराग्रह नाही,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सुट्टीच्या दिवशीही चालणार कामकाज

शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशीही कामकाज करण्यात येणार आहे. नागपूर अधिवेशनात दररोज १० तासांहून अधिक कामकाज करण्याचा शासनाचा प्रयत्न राहील. या अधिवेशनात १८ विधेयके मांडली जाणार असून विदर्भ आणि मराठवाड्याशी संबंधित अधिकाधिक प्रश्नांवर चर्चा होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. दावोससह विविध मंचांवर झालेले गुंतवणूक करार मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्षात येत असून हे उद्योग महाराष्ट्रात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सरकारचा चहापानाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला बहारीनमध्ये असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर राहिले. याच अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला. विरोधकंनी जे आरोप केले त्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरं दिली.