मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी अबोला आहे का? विचारताच एकनाथ शिंदेंचं खुमासदार उत्तर
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात ऑल इज नॉट वेल असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या. दरम्यान दोन्ही नेत्यांनी याबाबत कधीही भाष्य केलं नाही. आमच्यात योग्य संवाद आहे हेच दोन्ही नेत्यांनी वेळोवेळी सांगितलं. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीसांशी अबोला धरला होतात का? असा प्रश्न विचारण्यात आला. ज्यावर त्यांनी अतिशय खुमासदार असं उत्तर दिलं. ज्यामुळे पत्रकार परिषदेत हशा पिकला.
भाजपा आमदारांच्या एकनाथ शिंदेंच्या चार्टर्ड विमानाने प्रवास?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विमानात जागा भरल्यामुळे काही भाजपा आमदारांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चार्टर्ड विमानाने प्रवास करावा लागल्याचं वृत्त काही वाहिन्यांनी दिलं आहे. दोन्ही पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी एकत्र प्रवास केल्याने संवाद आणि समन्वयाचे स्पष्ट संकेत मिळाल्याचं चित्र आहे. ज्यामुळे महायुतीतील नेत्यांमध्ये सलोखा निर्माण झाल्याचं बोललं जातं आहे.मुंबई–नागपूर विमान प्रवासासाठी दिवसभर तिकिटे उपलब्ध नसल्याने काही मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांना चार्टर विमानांवर अवलंबून राहावे लागलं. अनेकांनी चहापान कार्यक्रमाला वेळेत पोहोचण्यासाठी वैयक्तिक किंवा एकत्र येत चार्टर्ड विमानाची व्यवस्था केली अशीही चर्चा आहे.
रविंद्र चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे परिस्थिती चिघळली होती
भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वर्चस्वाची आणि श्रेयवादाची लढाई तीव्र झाली आहे. भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी शिवसेनेवर केलेल्या थेट टीकेनंतर परिस्थिती अधिकच चिघळली होती. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचया निवडणुकीत हा संघर्ष आणखी वाढला. एकूणच शिंदे आणि फडणवीस यांच्यात अबोला असल्याच्या चर्चांना आणखी बळकटी मिळते. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार (८ डिसेंबर २०२५) पासून नागपूर येथे सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत या कथित अबोलाच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे.
अबोल्याच्या प्रश्नावर नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माध्यमांच्या प्रतिनिधिंनी प्रश्न विचारला की, तुम्ही मुख्यमंत्र्यांसोबत बोलत नाहीत तर असा काही अबोला घेतला आहे का? पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही काय करतो… रोज एकमेकांना फोन करतो ना? त्याचं तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो. नाही तर रोज एक फोटो इंस्टाग्रामला ठेवतो… नाही तर मग एक काम करतो की आता आम्ही हास्यजत्रेतच जातो असं उत्तर एकनाथ शिंदेंनी दिलं. ज्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.