जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार

जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार

 

देशातील ग्राहकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात महागाईचा मोठा झटका घेऊन येण्याची शक्यता आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या मागणीमुळे जगभरात निर्माण झालेली चिप्सची टंचाई आणि डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची झालेली ऐतिहासिक घसरण, या दुहेरी कारणामुळे जानेवारी २०२६ पासून टीव्ही, स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कार यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

कंपन्यांनी दिलेल्या संकेतनुसार, या वस्तूंच्या किंमतीत किमान ४ ते ५ टक्क्यांनी वाढ होईल, तर परिस्थिती अशीच राहिली तर ही दरवाढ १० टक्क्यांपर्यंत जाण्याची भीती व्यक्त होत आहे. एआय चिपच्या किंमती ५०० टक्क्यांनी वाढल्या आहेत.

AI चिप्सची टंचाई: सध्या जागतिक स्तरावर आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी वापरल्या जाणाऱ्या ‘हाय-बँडविड्थ मेमरी’ चिप्सची मागणी प्रचंड वाढली आहे. या मागणीमुळे अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सामान्य मेमरी चिप्सच्या पुरवठ्यात मोठी घट झाली आहे. अहवालानुसार, गेल्या काही महिन्यांत मेमरी चिप्सच्या किंमतीत तब्बल ५०० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. या वाढीव खर्चाचा बोजा कंपन्या थेट ग्राहकांवर टाकणार आहेत.

रुपयाचे ऐतिहासिक अवमूल्यन
भारतीय रुपयाने ९० रुपये प्रति डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. टीव्ही, स्मार्टफोन आणि लॅपटॉपसारख्या वस्तूंसाठी लागणारे ‘ओपन सेल’, सेमीकंडक्टर चिप्स आणि मदरबोर्ड यांसारखे ७० टक्क्यांहून अधिक घटक आयात करावे लागतात. रुपया कमजोर झाल्यामुळे आयातीचा खर्च प्रचंड वाढला आहे, ज्यामुळे उत्पादनाची एकूण किंमत वाढली आहे.

या दरवाढीमुळे, सरकारने अलीकडेच ३२ इंच किंवा त्याहून मोठ्या टीव्ही स्क्रीनवर जीएसटी दर २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आणून ग्राहकांना दिलेली दिलासादायक सवलत आता फिकी पडण्याची शक्यता आहे.