उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटील यांच्यावर टीका; “गद्दाराला विचारा काय धाडी काय पोलीस…”

उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटील यांच्यावर टीका; “गद्दाराला विचारा काय धाडी काय पोलीस…”

 

२०२२ मध्ये शिवसेनेत सर्वात मोठी फूट पडली. त्यावेळी शहाजीबापू पाटील यांचा एक डायलॉग चांगलाच प्रसिद्ध झाला होता. ‘काय झाडी, काय डोंगर ओक्के मध्ये आहे सगळं’ नगरपरिषदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी भाषण करताना याच डायलॉगचा संदर्भ घेत शहाजीबापू पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

मुंबईकर आता जागा झाला आहे-उद्धव ठाकरे

मुंबईकर आता जागा झाला आहे. इथे सगळे फेटे घालणारे आहेत. पण आपल्याला थापा मारुन टोप्या घालणारे कोण? हे आता मुंबईकरांना कळलं आहे. सध्या मुंबईची हवा दुषित झाली आहे. हे प्रदूषण झालं आहे कारण इकडचे लोक खोके घेऊन तिकडे पसार झाले आहेत. गद्दार, गद्दारच आहेत हे आपल्यातून गेलेले लोक, त्यांना आता आपल्याला जागा दाखवायची आहे. यांची खा खा इतकी वाढली आहे की जणू काही त्यांना भस्म्या रोग झालाय. जे दिसेल ते खात आहेत. आज अनेक कामं मुंबईसाठी मागच्या २५ ते ३० वर्षांत केली आहेत. मी एक-एक गोष्टी आता प्रचारात सांगत जाईन.

शिवसेनेने कधीही पैसे देऊन मतं विकत घेतलेली नाही-उद्धव ठाकरे

मला आजपर्यंत एक तरी अशी निवडणूक दाखवा की शिवसेनेने पैसे देऊन मतं विकत घेतली आहेत. आता नगरपरिषद निवडणूक वगैरे बघा, सगळीकडे पैसे फेकून मतं विकत घेतली जात आहेत. कोकणात तर बघा पैसे सापडत आहेत. जो पकडून देतो त्याच्यावर गुन्हा दाखल करतात. जयकुमार गोरे म्हणत आहेत की नवरा तुम्हाला १०० देत नव्हता, देवाभाऊ १५०० रुपये महिलांना देतो आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवा हे ऐकून तर हसावं की रडावं हा प्रश्न मला पडला. तुम्ही काय नवरा बायकोमध्ये आता भांडणं लावत आहात का? महायुती नाही महाझुठी आहे ही. यांच्या हाती मुंबई माझा मुंबईकर देणार नाही.

गद्दाराला विचारा आता काय धाडी…

आपल्यातला एक गद्दार गेला त्याचा डायलॉग फेमस झाला होता काय झाडी काय डोंगर वगैरे.. आता त्याला जाऊन विचारा कारण त्याच्यावर ईडीची धाड पडली आहे. आता म्हण काय धाडी, काय पोलीस आणि जा आता तुरुंगात. या लोकांना मुंबईची वाट लावत आहेतच. नाशिकमध्ये साधुग्रामसाठी १७०० हून जास्त झाडं कापायचा निर्णय घेतला आहे. मला नाशिकच्या लोकांनी फोन केला की आता काय करायचं? मी त्यांना म्हटलं तपोवनातली झाडं भाजपात गेली अशी बातमी द्या, म्हणजे झाडांची कत्तल थांबेल. झाडं भाजपात जाऊ शकत नाहीत म्हणून त्यांची कत्तल चालवली आहे. हिंदुत्वाचं नाव घ्यायचं आणि कंत्राटदारांचं काम करायचं. यालाच म्हणतात रामाचं नाव घ्यायचं आणि या गोष्टी करायच्या, याला म्हणतात मुँह में राम नाम और बगल में अदाणी अशीही टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.