५ डिसेंबरला राज्यभर शाळा बंद, शिक्षण संस्था महामंडळाची शासनाशी तातडीच्या चर्चेची मागणी
मुंबई: राज्यातील विविध शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनांनी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांविरोधात शुक्रवार, ५ डिसेंबर २०२५ रोजी राज्यभर शाळा बंद आंदोलन घोषित केले आहे. हे आंदोलन प्रभावी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून, सर्व सभासद संस्थांना शाळा बंद ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे.
पवित्र पोर्टल मार्फत सुरू असलेली शिक्षक भरती तात्काळ रद्द करावी, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती तातडीने सुरू करावी, थकीत वेतनेत्तर अनुदान लवकरात लवकर सुरू करावे, शिक्षण संस्थांच्या इमारतींवरील मालमत्ता कर माफ करावा, राज्यभरातील शाळांसाठी सौर ऊर्जा प्रणाली शासनामार्फत बसविणे, आरटीइ अंतर्गत थकीत रकमेची संपूर्ण प्रतिपूर्ती करणे, अशा अनेक महत्त्वाच्या मागण्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत.
संबंधित प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी शासनाने तातडीने बैठक आयोजित करावी, तातडीने चर्चा घडवून आणावी अशी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे रविंद्र फडणविस यांनी म्हटले आहे. आगामी काळात इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार आहे. तसेच प्रात्यक्षिक परीक्षा आणि तोंडी परीक्षा न लवकरच सुरुवात होणार आहे.
परीक्षेच्या तोंडावर शिक्षण संस्था चालक शाळा बंद करण्याचा इशारा दिला आहे, यामुळे शासनाची मोठी अडचण होणार आहे. त्यामुळे शिक्षण संस्था चालकांच्या मागण्यांवर तोडगा काढणे आवश्यक ठरणार आहे. विशेष म्हणजे परीक्षेच्या तोंडावर दरवर्षी संस्था चालक आणि शिक्षकाकडून त्यांच्या मागण्यासाठी शासनाला वेठीस धरले जाते. यावेळी अनेकदा चर्चा करून मार्ग काढला जातो. मात्र यावर्षी संस्थाचालकांनी कठोर भूमिका घेतल्यानंतर शासनाची अडचण वाढणार आहे.