बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचा ४१ पैकी ३५ जागांवर दमदार विजय; नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव यांचा  एकतर्फी विजय

बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचा ४१ पैकी ३५ जागांवर दमदार विजय; नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव यांचा एकतर्फी विजय

 

बारामती: बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने ४१ पैकी ३५ जागांवर दमदार विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव यांनी ३४ हजार ११४ मतांचं मताधिक्य मिळवत या निवडणुकीत विजय मिळवला आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीला सहा जागांवर पक्षांतर्गत नाराजीचा फटका बसला असून या ठिकाणी चार अपक्ष आणि बहुजन समाज पार्टी व राष्ट्रवादी शरद पवार गटाने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे.

बारामती येथील मएसो विद्यालयाच्या सभागृहात मतमोजणी पार पडली. तत्पूर्वी राष्ट्रवादीने ८ जागांवर बिनविरोध विजय मिळवला होता. उर्वरीत ३३ जागा आणि नगराध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. त्यामध्ये राष्ट्रवादीने २७ जागांवर विजय मिळवला. तर चुरशीच्या ठरलेल्या प्रभागातील सहा जागांवर चार अपक्ष, बहुजन समाज पार्टी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे.

नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव यांचा अपेक्षेप्रमाणे एकतर्फी विजय मिळवला आहे. त्यांना एकूण ४० हजार ७६६ मते पडली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार काळूराम चौधरी यांना ६६५२ इतकी मते मिळाली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार बळवंत बेलदार यांना ५०५३, तर भाजपचे उमेदवार गोविंद देवकाते यांना २५०१ इतक्या मतांवर समाधान मानावे लागले. सचिन सातव यांनी या निवडणुकीत ३४ हजार ११४ मतांचं मताधिक्य घेत विजय मिळवला आहे.

राष्ट्रवादीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी यादी जाहीर केली होती. त्यामध्ये काही ठिकाणी ऐनवेळी बदल करण्यात आल्याची चर्चा होत होती. त्यामुळं पक्षांतर्गत नाराजी अपक्षांच्या विजयासाठी कारणीभूत ठरली आहे. त्याचवेळी काही जागांवर उमेदवार देताना राजकीय गणितापेक्षा स्वकीयांचा विचार केला गेला. त्यामुळं राष्ट्रवादीसाठी एकतर्फी असलेल्या या निवडणुकीत अनपेक्षितपणे पराभव स्वीकारावा लागला आहे.

बारामती नगरपरिषद निवडणुकीतील विजयी उमेदवार

नगराध्यक्षपद : सचिन सदाशिव सातव (राष्ट्रवादी), प्रभाग क्र. १ : मनीषा समीर चव्हाण (राष्ट्रवादी), अविनाश निकाळजे (राष्ट्रवादी), प्रभाग क्र. २ : जय पाटील (राष्ट्रवादी), अनुप्रिता डांगे (बिनविरोध, राष्ट्रवादी), प्रभाग क्र. ३ : प्रवीण दत्तू माने (राष्ट्रवादी), रुपाली नवनाथ मलगुंडे (राष्ट्रवादी), प्रभाग क्र. ४ : विष्णुपंत चौधर (राष्ट्रवादी), संपदा चौधर (राष्ट्रवादी), प्रभाग क्र. ५ : किशोर आप्पासाहेब मासाळ (राष्ट्रवादी), वनिता अमोल सातकर (अपक्ष), प्रभाग क्र. ६ : अभिजीत जाधव (बिनविरोध, राष्ट्रवादी), धनश्री अविनाश बांदल (बिनविरोध, राष्ट्रवादी), प्रभाग क्र. ७ : प्रसाद खारतुडे (राष्ट्रवादी), भारती विश्वास शेळके (राष्ट्रवादी), प्रभाग क्र. ८ : अमर धुमाळ (राष्ट्रवादी), श्वेता योगेश नाळे (बिनविरोध, राष्ट्रवादी), प्रभाग क्र. ९ : विशाल भानुदास हिंगणे (राष्ट्रवादी), पूनम ज्योतीबा चव्हाण (राष्ट्रवादी), प्रभाग क्र. १० : जयसिंग देशमुख (राष्ट्रवादी), मनीषा संदीप बनकर (अपक्ष), प्रभाग क्र. ११ : संजय संघवी (राष्ट्रवादी), सविता जाधव (राष्ट्रवादी), प्रभाग क्र. १२ : अभिजीत चव्हाण (राष्ट्रवादी), सारीका अमोल वाघमारे (राष्ट्रवादी), प्रभाग क्र. १३ : बिरजू भाऊसाहेब मांढरे (राष्ट्रवादी), आरती गव्हाळे (राष्ट्रवादी शरद पवार), प्रभाग क्र. १४ : नवनाथ बल्लाळ (राष्ट्रवादी), संघमित्रा काळूराम चौधरी (बसपा) , प्रभाग क्र. १५ : यशपाल सुनील पोटे (अपक्ष), मंगल जयप्रकाश किर्वे (राष्ट्रवादी), प्रभाग क्र. १६ : मंगल शिवाजीराव जगताप (राष्ट्रवादी), गोरख पारसे (राष्ट्रवादी), प्रभाग क्र. १७ : अलताफ सय्यद (राष्ट्रवादी), शर्मिला शिवाजीराव ढवाण (बिनविरोध, राष्ट्रवादी), प्रभाग क्र. १८ : राजेंद्र सोनवणे (राष्ट्रवादी), अश्विनी सूरज सातव (बिनविरोध, राष्ट्रवादी), प्रभाग क्र. १९ : सुनील दादासाहेब सस्ते (राष्ट्रवादी), प्रतिभा विजय खरात (राष्ट्रवादी), प्रभाग क्र. २० : नीलेश इंगुले (अपक्ष), दर्शना विक्रांत तांबे (राष्ट्रवादी), आफरीन फिरोज बागवान (बिनविरोध, राष्ट्रवादी).