बारामती तालुक्यात मतदानाची प्रक्रिया सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची माळेगाव येथील साखर शाळेला भेट

बारामती तालुक्यात मतदानाची प्रक्रिया सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची माळेगाव येथील साखर शाळेला भेट

 

बारामती : बारामती तालुक्यात आज नगरपालिका निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू असतानाच उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांनी माळेगाव येथील साखर शाळेला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यामुळे राजकीय तसेच शैक्षणिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

माळेगाव येथील साखर शाळेच्या मैदानावर अजित पवार यांनी शाळेच्या भौतिक सुविधा, शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांची उपस्थिती, तसेच पोषण आहार व्यवस्थेची माहिती घेतली. यावेळी शाळेतील कर्मचारी, शिक्षक आणि व्यवस्थापनाशी त्यांनी सविस्तर संवाद साधला.यावेळी माळेगांव कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक पाटील, संचालक योगेश जगताप कारखान्याचे अधिकारी वर्ग उपस्थित होते.

पाहणीदरम्यान अजितदादांनी स्पष्ट शब्दांत सूचना देताना सांगितले की, साखर शाळेतील सगळ्या सुविधा व्यवस्थितपणे पूर्ण झाल्या पाहिजेत. शाळेत येणाऱ्या मुलांना पोषण आहार, स्वच्छता आणि सुरक्षित वातावरण मिळालं, तरच पालक आपली मुलं निर्धास्तपणे शाळेत पाठवतील.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषण आहाराचे महत्त्व अधोरेखित करत, केवळ शिक्षण नव्हे तर आरोग्य, खेळाची साधने आणि शिस्त यावरही भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शाळेतील अडचणी, आवश्यक निधी आणि भविष्यातील सुधारणा याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

विशेष म्हणजे, बारामतीत मतदान सुरू असतानाच अजित पवार माळेगावमध्ये शैक्षणिक संस्थेच्या पाहणीसाठी उपस्थित राहिल्याने, राजकारणासोबतच विकासकामांनाही तेवढेच महत्त्व देण्याचा संदेश त्यांनी दिल्याचे पाहायला मिळाले. या भेटीमुळे साखर शाळेतील कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, शाळेच्या सुविधा अधिक सक्षम होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.