पुणे जिल्ह्यात १७ पैकी १० ठिकाणी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नगराध्यक्षपद
बारामती: राज्यात महायुतीने नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला असतानाच पुणे जिल्ह्यातही उपमुख्यमंत्री अजित पवार हेच कारभारी असल्याचं आजच्या निकालात स्पष्ट झालं आहे. जिल्ह्यातील १७ पैकी १० ठिकाणी अजितदादांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने नगराध्यक्षपद मिळवत सत्तेची सूत्रे ताब्यात घेतली आहेत. त्यामुळं पुणे जिल्ह्यात अजितदादांचा दबदबा कायम असल्याचं या निकालातून समोर आलं आहे.
जिल्ह्यातील १७ नगरपरिषद व नगरपंचायतींची मतमोजणी आज पार पडली. त्यामध्ये १० ठिकाणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. तर शिवसेना शिंदे गटाने चार आणि भाजपने तीन जागांवर यश मिळवले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला एकही जागा मिळवता आलेली नाही. अजितदादांनी पुणे जिल्ह्यातील आपला दबदबा कायम राखत जिल्ह्याचे कारभारी आपणच आहोत हे दाखवून दिले आहे.
जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, सासवड, जेजूरी, चाकण, शिरूर, भोर, जुन्नर, राजगुरूनगर, वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे, मंचर, माळेगाव, उरुळी-फुरसूंगी, आळंदी,लोणावळा या ठिकाणच्या नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये राष्ट्रवादीला १० ठिकाणी नगराध्यक्षपद मिळवण्यात यश आले आहे. यामध्ये अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या बारामती, इंदापूर, दौंडचाही समावेश आहे.
जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायतीचे पक्षनिहाय नगराध्यक्ष
- बारामती : सचिन सातव, राष्ट्रवादी काँग्रेस
- लोणावळा : राजेंद्र सोनवणे, राष्ट्रवादी कॉँग्रेस
- तळेगाव दाभाडे : संतोष दाभाडे (भाजपा महायुती)
- दौंड : दुर्गादेवी जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस
- चाकण : मनीषा गोरे, शिवसेना
- शिरूर : ऐश्वर्या पाचरणे, राष्ट्रवादी काँग्रेस
- इंदापूर : भरत शाह राष्ट्रवादी काँग्रेस
- सासवड : आनंदी काकी जगताप,भाजपा
- जेजुरी : जयदीप बारभाई, राष्ट्रवादी काँग्रेस
- भोर : रामचंद्र आवारे, राष्ट्रवादी काँग्रेस
- आळंदी : प्रशांत कुराडे, भाजपा
- जुन्नर : सुजाता काजळे, शिवसेना शिंदे गट
- राजगुरुनगर : मंगेश गुंडा, शिवसेना शिंदे गट
- वडगाव मावळ : आंबोली ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेस
- मंचर : राजश्री गांजले, शिवसेना शिंदे गट
- माळेगाव : सुयोग सातपुते, राष्ट्रवादी काँग्रेस
- उरुळी फुरसुंगी : संतोष सरोदे, राष्ट्रवादी काँग्रेस