बारामती व्यापारी महासंघ व मर्चंट असोसिएशन यांच्यावतीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार संपन्न
बारामती: बारामती व्यापारी महासंघ व बारामती मर्चंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. बारामती शहरात अनेक वर्षांपासून व्यापारी महासंघ व बारामती मर्चंट असोसिएशन कार्यरत असून, व्यापारी हितासाठी त्यांनी सातत्याने उल्लेखनीय कार्य केले आहे.
बारामतीतील कोणतेही निवडणूक पर्व असो, व्यापारी बांधवांचा सक्रिय सहभाग कायमच निर्णायक ठरलेला आहे. व्यापाऱ्यांच्या पाठिंब्याशिवाय कोणतीही निवडणूक पुढे जात नाही, हे बारामतीच्या राजकारणात अनेक वेळा दिसून आले आहे. व्यापारी ज्या बाजूने उभे राहिले, त्या बाजूचा निकाल लागल्याचे अनेक राजकीय लाटांमध्ये स्पष्ट झाले आहे.विशेष म्हणजे,व्यापारी संघटना नेहमीच पवार कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्याचे चित्र बारामतीत पाहायला मिळते.
दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने पवार साहेबांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी बारामतीतील तसेच परिसरातील अनेक व्यापारी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. हा कार्यक्रम व्यापारी आणि राजकीय नेतृत्व यांच्यातील दृढ संबंधांचे प्रतीक मानला जातो.
यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन सातव यांनी आपल्या भाषणात व्यापाऱ्यांशी असलेले नाते अधोरेखित केले. “मीही तुमच्यातलाच एक व्यापारी आहे, हे काही लोक विसरतात,” असे सांगत त्यांनी दिवाळीच्या काळात २५०० फोरव्हीलर वाहनांचा विक्रीचा विक्रम आपल्या नावावर असल्याचा उल्लेख केला. त्यामुळे आपण केवळ नगराध्यक्षच नाही तर व्यापारी समुदायाचा एक घटक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचा खर्च सोमानी ग्रुप यांनी उचलला होता. याबद्दल उपस्थितांनी त्यांचे विशेष कौतुक केले. यावेळी माजी नगराध्यक्ष सुभाष शेठ सोमानी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. बारामतीच्या विकासात त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
यावेळी संजय दुधाळ, सुभाष सोमानी संभाजी किरवे (मर्चंट असोसिएशन अध्यक्ष), व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुशील सोमानी आदींनी मनोगत व्यक्त केले यावेळी फोन द्वारे व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष नरेंद्र गुजराती यांनी आपला शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रशांत चांदगुडे,महेश ओसवाल,प्रविण आहुजा,अतुल गांधी,पारस खटावकर,पंडीत भागवत,शाम तिवाटणे,सुरेंद्रशेठ मुथा,फकरुद्दीनशेठ कायमखानी,किशोरशेठ सराफ तसेच इतर व्यापारी अनेक मान्यवर उपस्थित होते.