पुण्यात निवडणुकीचा नवा पॅटर्न; 'हे' तीन पक्ष एकत्रित निवडणूक लढवणार
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आघाडीमध्ये बिघाडी निर्माण झाली होती. रविवारी रात्रीपासूनच काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) यांच्यात जागा वाटपाच्या बैठका सुरू होत्या. सोमवारी पहाटे शिवसेना आणि काँग्रेसमधील जागा वाटपाचा तिढा सुटला. तर शिवसेना आणि मनसे यांच्यात यापुर्वीच युती झाली आहे. जागा वाटपात शिवसेनेला वाट्याला आलेल्या जागेतून मनसेला जागा देण्याचा पर्याय काढण्यात आला. त्यानुसार १६५ जागांपैकी काँग्रेसच्या वाट्याला १०० तर शिवसेनेला ६५ जागा आल्या आहेत. शिवसेनेच्या वाट्याच्या ६५ जागांपैकी २१ जागा मनसेला देण्याचा निर्णय शिवसेना आणि मनसे यांच्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आघाडीत सुरू असलेल्या जागा वाटपाचा निर्णय अंतिम झाला. शिवसेना आणि काँग्रेस आघाडीवर शिक्कामोर्तब झाल्याचे अधिकृत घोषणा दोन्ही पक्षांकडून सोमवारी दुपारी करण्यात आली.
त्यानंतर दोन्ही पक्षांकडून इच्छुकांना एबी फॉर्मचे वाटप सुरू करण्यात आले. आघाडीमध्ये समविचारी पक्ष सहभागी करून घेण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला आहे. समविचारी पक्ष आघाडीत आल्यानंतर त्यांना काँग्रेसच्या वाट्यातून जागा देण्याचे ठरले असल्याचे दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आले.
१८ वर्षांनतर पॅटर्नमध्ये बदल
महापालिकेच्या २००७ मध्ये झालेल्या निवडणुकांनंतर काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी असा पुणे पॅटर्न अस्तित्वात आला होता. राज्यभरात या पॅटर्नची चर्चा झाली होती. आता १८ वर्षांनंतर पुन्हा एक नवा पॅटर्न महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने आला आहे. यापूर्वीच्या पुणे पॅटर्नमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला सोडून बाहेर पडली आहे. तर नव्या पॅटर्नमध्येशिवसेने आपली ‘मशाल’ काँग्रेसच्या ‘हाती’ दिली आहे. तर या दोन्हींच्या आडून मनसे पॅटर्नमध्ये सहभागी झाली आहे. त्यामुळे निवडणुकीत हा पॅटर्न किती यशस्वी होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
तिरंगी लढत होणार
एकीकडे काँग्रेस शिवसेना आघाडी, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष असे तीन प्रमुख पक्ष रिंगणात उतरणार असल्याचे असे चित्र निर्माण झाले आहे. भाजप- शिवसेना युतीमधील जागा वाटपाचा वाद अद्याप मिटलेला नाही. त्यामुळे शिवसेना स्वतंत्र लढणार की राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यास चौरंगी लढत होणार आहे.