पहाटेच्या वेळी पतीने पत्नीच्या डोक्यात घाव घालत केला खून; इंदापूर तालुक्यातील घटना

पहाटेच्या वेळी पतीने पत्नीच्या डोक्यात घाव घालत केला खून; इंदापूर तालुक्यातील घटना

 

इंदापूर: इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथे धक्कादायक घटना घडली आहे. पहाटेच्या वेळी आंघोळीला निघालेल्या पत्नीच्या डोक्यात लाकडी वस्तूने घाव घालत पतीनेच तिचा खून केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर आरोपी पती फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर इंदापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

मनीषा मल्हारी खोमणे (वय ३५) असं मृत महिलेचं नाव आहे. तिचा पती मल्हारी उर्फ बापू खोमणे याने डोक्यात जोरदार प्रहार करून तिची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास मनीषा खोमणे या अंघोळीसाठी जात होत्या. त्यावेळी त्यांच्या पतीने पाठीमागून लाकडी वस्तूने डोक्यात जोराचा घाव घातला. त्यामध्ये मनीषा खोमणे या जागीच कोसळल्या. त्यांना इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, पोलीस उपनिरीक्षक रतीलाल चौधर, पोलीस हवालदार दादासाहेब डोईफोडे आणि पोलीस कर्मचारी गुलाब पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत या घटनेची माहिती घेतली. बापू खोमणे याने आपल्या पत्नीचा खून का केला याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या घटनेनंतर बापू खोमणे हा फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, संशयित आरोपी मल्हारी उर्फ बापू खोमणे याच्यावर यापूर्वीही वालचंदनगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेनंतर शेळगाव परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.