बारामतीच्या पराभवानंतर युगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया, “महायुतीची ताकद खूप…”
बारामती: राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तारीख जाहीर केली आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये मतदान १५ जानेवारीला पार पडेल, तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होईल. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. दरम्यान नगर परिषद निकालांमध्ये बारामतीत अजित पवारांचा पक्ष वरचढ ठरला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एक जागाच मिळाली आहे. त्यावर आता युगेंद्र पवार यांनी भाष्य केलं आहे.
काय म्हणाले युगेंद्र पवार?
एकेकाळी आमचेच नगरसेवक निवडून येत होते. विरोधातले इतके येतील असं वाटलं नव्हतं. सहा जागा विरोधात आल्या. सहा उमेदवार १०० ते १५० मतांनी हरले. मी काम करत होतो. माझी जबाबदारी होती, त्यामुळे मी काम करत होतो. पण आज सत्ता आपली नाही. महायुतीची ताकद खूप मोठी आहे. पुढच्या वेळी आपल्याला वेगळं चित्र दिसेल. आमचा एकच उमेदवार आला आहे पण पॅनलवर दोन जण निवडून आले आहेत. निवडणून आलेल्यांच्या मागे महायुतीची ताकद होती. मात्र आता बारामतीची सत्ता पुढच्या वेळी आमच्याकडे येईल याचा विश्वास मला आहे.
अजित पवारांच्या पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे किती नगराध्यक्ष?
पुणे जिल्ह्यात १४ नगरपरिषदा आणि आणि ३ नगर पंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. यापैकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने १० जागांवर यश मिळवलं आहे. बारामती, लोणावळा, दौंड, तळेगाव दाभाडे, शिरुर, जेजुरी, भोर, इंदापूर, वडगाव, फुरसुंगी, माळेगाव अशा दहा ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नगराध्यक्ष बसणार आहेत.