भाजपा २०२९ ची विधानसभा स्वबळावर लढणार का? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राजकीय समीकरण

भाजपा २०२९ ची विधानसभा स्वबळावर लढणार का? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राजकीय समीकरण

 

राज्याच्या राजकारणात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी सुरू आहेत. यातच नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज (२ डिसेंबर) मतदान पार पडत आहे. नगरपरिषदेच्या या निवडणुकीत महायुतीमधील पक्षच काही ठिकाणी आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. यातच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, या चर्चा दोघांनीही फेटाळून लावल्या आहेत.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भूमिका मांडली. तसेच भारतीय जनता पक्ष २०२९ ची विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढणार की महायुतीत? याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मोठं भाष्य केलं आहे. ‘२०२९ मध्ये आम्ही (भाजपा-शिवसेना शिंदे-राष्ट्रवादी अजित पवार) युती म्हणूनच निवडणूक लढणार आहोत’, असं देवेंद्र फडणवीस यांनी ‘सकाळ संवाद’मध्ये बोलताना स्पष्ट केलं आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“आमची ताकद वाढली असली तरी माझं मत आहे की आजही महाराष्ट्रात आमच्या दोन्ही मित्र पक्षांची आम्हाला गरज आहे. २०२९ मध्ये देखील आम्ही महायुतीमध्येच विधानसभेची निवडणूक लढणार आहोत. आम्ही आमची ताकद वाढवतच राहू, आम्ही आमची ताकद कुठेही कमी होऊ देणार नाही. पण आमची ताकद वाढली म्हणून मित्र पक्षांना सोडून द्यायचं असं आम्ही कधीही होऊ देणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदेंशी मतभेद आहेत का? देवेंद्र फडणवीसांनी सोडलं मौन

“माझ्यात आणि एकनाथ शिंदेंचे कुठलेही वाद नाहीत. आपल्या घरातही दोन भावांची मतं ही काही प्रमाणात वेगवेगळी असतात. ती मतं एक नसतात. प्रखरतेने दोन्ही भाऊ ती मतं मांडत असतात. तसं काही गोष्टींवर आमचं एकमत होत नाही. सगळ्या गोष्टीत एकमत झालं असतं तर वेगळे पक्षात कशाला राहिलो असतो? आम्ही एकच पक्ष असतो. आम्ही वेगळे पक्ष आहोत. आमची मतमतांतरं आहेत. व्यापक दृष्टीने पाहिलं तर आम्ही एकत्र आहोतच आणि आम्ही एकत्र राहणार आहोत. एखाद्या निवडणुकीत काही गोष्टी घडल्या की लगेच मतभेद असं काही नसतं. नगर परिषद, नगर पंचायत या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. निवडणुका आल्या की गोष्टी तुमच्यावर आम्ही लादू असं करता येत नाही.” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“या निवडणुकीत तुम्हाला एकनाथ शिंदे आणि पवार काही ठिकाणी एकत्र दिसले, काही ठिकाणी भाजपा आणि एकनाथ शिंदे एकत्र आहेत, काही ठिकाणी आम्ही तिघंही एकत्र होतो. सगळी समीकरणं या निवडणुकीत पाहण्यास मिळाली. कारण या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.