शरद पवार आगामी काळात एनडीए मध्ये सामील होणार? दोन पवार एकत्र येण्याच्या चर्चेवर जयंत पाटील म्हणाले…

शरद पवार आगामी काळात एनडीए मध्ये सामील होणार? दोन पवार एकत्र येण्याच्या चर्चेवर जयंत पाटील म्हणाले…

 

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट एकत्र येण्याची तयारी करत आहेत. हे दोन गट एकत्र आल्यास आगामी काळात शरद पवार एनडीएमध्ये सामील होतील, असे विधान राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी केले होते. या विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (शरद पवार) यांना प्रश्न विचारला असता त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. शिवसेनेचे (ठाकरे) नेते उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना आघाडी, युती, प्रशांत जगताप यांचा राजीनामा या घडामोडींवर भाष्य केले.

नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्यानंतर आता राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष सज्ज झाले आहेत. ठिकठिकाणी स्थानिक युती, आघाडी याची चर्चा होत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी आपापल्या सोयीने काही ठिकाणी आघाडी-युती करताना दिसत आहेत. ठाकरे बंधू मुंबईत एकत्र आले आहेत. तर पुण्यात दोन पवार गट एकत्र येण्याची तयारी करत आहेत.

आगामी काळात शरद पवार एनडीएमध्ये सामील झालेले दिसतील, या संजय शिरसाट यांच्या विधानाबद्दल जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा काही लोकांचा प्रयत्न दिसतो. महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या शहरात शक्य आहे, तिथे महाविकास आघाडीमध्येच लढविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

प्रशांत जगताप चांगले कार्यकर्ते होते

प्रशांत जगताप यांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारला असता जयंत पाटील म्हणाले की, ते एक चांगले कार्यकर्ते होते. मला दुःख वाटते की त्यांनी आमचा पक्ष सोडला. मागच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीसाठी शिवसेनेने त्यांचा आग्रह मागे घेतला आणि प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यासाठी त्यांच्या उमेदवाराला थांबवले. प्रशांत जगताप यांना त्यावेळी यश आले नाही. पण महानगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून ते काही काळ काम करत होते. त्यांची आणि माझी चर्चा झालेली नाही. त्यांनी पक्ष सोडायला नको होता, असे माझे मत आहे.

पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र येणार का?

पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र येत आहेत याबद्दल विचारले असता जयंत पाटील म्हणाले की, ३० तारखेला अर्ज भरण्याचा शेवटाचा दिवस आहे. त्याआधी मी महाराष्ट्रातील सगळ्या शहरात कोण-कोणाशी युती करत आहे, याची माहिती घेतलेली नाही. त्यामुळे सर्व महाराष्ट्रात वेगवेगळ्या स्तरावर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेतृत्व आणि पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते ज्या मताचे आहेत, त्या मताप्रमाणे आम्ही वेगवेगळ्या महानगरपालिकांत करतोय, असे जयंत पाटील म्हणाले.

संजय शिरसाट काय म्हणाले होते?

माध्यमांशी बोलत असताना राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, “शरद पवार काहीही करू शकतात. त्यांच्या अनेकवेळा भूमिका बदलताना पाहिलेल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्याशी आघाडी करतील, असे कधी वाटले नव्हते. पण त्यांनी आघाडी केली आणि अडीच वर्ष सत्ता भोगली. सोनिया गांधींचा विरोध करून पक्ष स्थापन केला होता, त्यानंतर पुन्हा काँग्रेसशी आघाडी केली. आता ते एनडीएत आले तरी आश्चर्य वाटणार नाही. शरद पवार कधीही काहीही निर्णय घेऊ शकतात, याची संपूर्ण राज्याला कल्पना आहे.”