अजित पवारांनी टोक गाठलं, कुख्यात गुंड आंदेकरांच्या घरात दोघींना तिकीट, तुरुंगातून निवडणूक लढवणार

अजित पवारांनी टोक गाठलं, कुख्यात गुंड आंदेकरांच्या घरात दोघींना तिकीट, तुरुंगातून निवडणूक लढवणार

 

पुणे: अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाकडून आयुष कोमकर हत्याप्रकरणात  तुरुंगात असलेल्या सोनाली आणि  लक्ष्मी आंदेकर यांना महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 23 मधून सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहेत. या दोघीही तुरुंगातुन निवडणूक लढवणार आहेत. आयुष कोमकर हत्या प्रकरणात दोघी तुरुंगात आहेत. तत्पूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आज गुंड गजा मारणेची बायको जयश्री मारणेला हिलादेखील पुण्यातून उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर आता गुन्हेगारीचा तगडा इतिहास असलेल्या आंदेकर कुटुंबातील दोघांना अजित पवारांनी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पुणे गुन्हेगारीमुक्त करेन, या अजित पवारांच्या शब्दावर कितपत विश्वास ठेवायचा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

बंडू आंदेकर आणि त्यांच्या कुटुंबातील लक्ष्मी उदयकांत आंदेकर तसेच सोनाली वनराज आंदेकर यांना आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिली होती. यानंतर लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांनी 27 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र बंडू आंदेकरला उमेदवारी अर्ज दाखल करताना मिरवणूक, भाषण, घोषणाबाजी करायला कोर्टाने मनाई केली. सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर हेदेखील 5 कोटी 40 लाखांच्या खंडणी प्रकरणात जेलमध्ये आहेत. आता यांना प्रचार करताना मात्र नियम पाळावे लागणार आहेत.

माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा नातेवाईक असलेल्या गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याची गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. या हत्येमुळे आंदेकर टोळीतील वाद अधिक चिघळला. या प्रकरणात बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (70, रा. नाना पेठ) याच्यासह 13 जणांविरोधात खून आणि मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खटल्यातील आरोपी आणि बंडू आंदेकर याचा मुलगा कृष्णा उर्फ कृष्णराज आंदेकर (36) हा आयुषच्या खुनानंतर फरार झाला होता. काही दिवसांपूर्वी बंडू आंदेकर याने सार्वजनिकरित्या "कृष्णाचा शोध द्या, नाहीतर त्याचा एन्काउंटर होईल," असा दावा केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कृष्णा आंदेकर स्वतःहून समर्थ पोलिस ठाण्यात हजर झाला.