विकासाचा वादा अजित दादा, विकासाचा प्रवास थांबणार नाही - नगराध्यक्ष सचिन सातव
बारामती : विकासाचा वादा अजित दादा” हे वाक्य आज बारामतीत जनसामान्यांच्या मनात घट्ट रुजले आहे. युवकांपासून अगदी लहान लहान मुलांपर्यंत, तोंडूनही हे वाक्य ऐकायला मिळते,यावरून बारामतीत विकासाची संकल्पना किती खोलवर पोहोचली आहे हे स्पष्ट होते. हीच विकासाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. विकास ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया असून, सर्वच बाबींमध्ये परिपूर्णता आली आहे असा दावा मी कधीही करणार नाही, मात्र विकासाचा प्रवास थांबणार नाही, असा ठाम विश्वास नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन सातव यांनी व्यक्त केला.
बारामती शहराच्या विस्ताराबाबत बोलताना ते म्हणाले की, पूर्वी बारामती नगरपालिकेचे कार्यक्षेत्र केवळ साडेपाच चौरस किलोमीटर इतके होते. मात्र आज हेच क्षेत्र वाढून जवळपास ५५ चौरस किलोमीटर झाले असून, बारामती शहराचा विस्तार जवळपास दहापट झाला आहे. या वाढलेल्या कार्यक्षेत्रामध्ये रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, उद्याने आणि इतर नागरी सुविधा प्रभावीपणे पुरवणे हे मोठे आव्हान असले, तरी नियोजनबद्ध विकासाच्या माध्यमातून हे आव्हान यशस्वीपणे पेलले जात आहे.
आपल्या राजकीय आणि सामाजिक वारशाचा उल्लेख करताना सचिन सातव म्हणाले की, “मला एका राजकीय कुटुंबाचा वारसा लाभला आहे. ही केवळ परंपरा नसून जनसेवेची मोठी जबाबदारी आहे. माझे आजोबा कै. कारभारी धोंडीबा सातव यांनी नगरपालिकेमध्ये तीन वेळा नगराध्यक्षपद भूषवले. त्यांनी प्रशासक काळातही नगराध्यक्ष म्हणून प्रभावी काम केले.अनेकांना बारामतीच्या या जुन्या इतिहासाची माहिती नाही.
तसेच चुलत आजोबा जयराम पांडुरंग सातव यांनी दोन वर्षे नगराध्यक्षपद भूषवले, तर १९९२ साली सदाशिव सातव (बापूजी) यांनी सलग पाच वर्षे नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले. २००१ ते २००२ या कालावधीत नगरपालिकेच्या अल्पकालीन टप्प्यातही सदाशिव सातव यांनी जवळपास नऊ महिने हे पद सांभाळले.पुढे २०१२ ते २०१४ या काळात त्यांच्या आई जयश्री सातव यांनी अडीच ते पावणेतीन वर्षे नगराध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली.
आमच्या कुटुंबाने या पदाकडे केवळ सत्तेचा किंवा मान-सन्मानाचा विषय म्हणून कधीही पाहिले नाही. या पदाचा उपयोग जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, शहराच्या विकासासाठी आणि सामान्य नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठीच केला आहे. हीच परंपरा पुढे चालवण्याची संधी मला २०२५ साली जनतेतून थेट पाच वर्षांसाठी मिळाली, हे माझ्यासाठी मोठे भाग्य आहे, असे सचिन सातव यांनी सांगितले.
या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार,खासदार सुनेत्रा पवार,तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मनःपूर्वक आभार मानले. “या निवडणुकीच्या माध्यमातून मला नगराध्यक्षपदाची मोठी जबाबदारी देण्यात आली.ही संधी दिल्याबद्दल मी अजित पवार,सुनेत्रा पवार आणि पक्षाचा कायम ऋणी राहीन,”अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
आपल्या सुरुवातीच्या वाटचालीचा उल्लेख करताना ते म्हणाले की, आदरणीय वडील सदाशिव सातव मार्गदर्शनाखाली आम्ही भावांनी सुरुवातीच्या काळात व्यावसायिक क्षेत्रात काम करत सामाजिक जाण निर्माण केली. त्या अनुभवातूनच जनतेच्या समस्या, प्रशासनाची जबाबदारी आणि विकासाचे महत्त्व समजले. याच शिदोरीवर पुढील पाच वर्षांत बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे.
बारामती शहराचा नियोजनबद्ध, समावेशक आणि लोकाभिमुख विकास हेच आपले अंतिम ध्येय असून ‘विकासाचा वादा अजित दादा’ ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करून दाखवू,असा विश्वास नगराध्यक्ष सचिन सातव यांनी व्यक्त केला.