अजितदादांच्या स्वप्नातील बारामती बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू - सचिन सातव
बारामती: बारामतीचा राज्यात आणि देशात एक वेगळा नावलौकीक आहे. या शहराचं नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची माझ्या कुटुंबातील तिसऱ्या पिढीला संधी मिळाली आहे. या संधीचं सोनं केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असं सांगत अजितदादांच्या स्वप्नातील बारामती बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या सांगता सभेत सचिन सातव यांनी जोरदार भाषण करत आपल्या राजकीय कौशल्याची चुणूक दाखवली.
बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादीची प्रचार सांगता सभा आज शारदा प्रांगण येथे पार पडली. या सभेत नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव यांनी आपल्या भाषणानं उपस्थितांची मने जिंकली. आपल्या कुटुंबातील तिसऱ्या पिढीला नगराध्यक्षपदाची संधी मिळत असून ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. पक्षाने आणि अजितदादांनी दाखवलेला विश्वास आपण आपल्या कामाच्या माध्यमातून सार्थ करून दाखवू असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
बारामती शहरातील सर्व घटकांच्या अडीअडचणी आपल्याला ज्ञात आहेत. त्यामुळं नगराध्यक्ष म्हणून काम करताना प्राधान्यानं नागरिकांचे प्रश्न सोडवण्यावर आपला भर असणार असल्याचं सांगून सचिन सातव यांनी आमराई, कसबा येथील घरकुलांचे प्रश्न, झोपडपट्टीतील नागरिकांच्या पुनर्वसनाचा विषय मार्गी लावण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना राबवण्यात येतील अशी ग्वाही दिली. बारामती शहर झोपडमुक्त व्हावं यासाठी विशेष लक्ष देण्याचा आमचा संकल्प असून या विकास प्रक्रियेत सामान्य नागरिक केंद्रबिंदू मानूनच सर्व निर्णय घेतले जातील, असंही ते म्हणाले.
बारामतीसाठी सातत्यानं झटणाऱ्या अजितदादांनी नगराध्यक्षपदासह अन्य सहकाऱ्यांना नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. दादांनी दाखवलेला हा विश्वास कधीही व्यर्थ जाऊ देणार नाही. दिलेल्या संधीचं सोनं केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं सांगत त्यांनी अजितदादांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पक्षाच्या सर्व उमेदवारांना सोबत घेऊन एकदिलानं काम करून शहराचा नावलौकीक वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पक्षाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्यानं निवडून देण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.