कोकाटेंचं मंत्रिपद बीडच्या नेत्याला मिळणार? धनंजय मुंडेंना जबरदस्त धक्का देण्याची तयारी

कोकाटेंचं मंत्रिपद बीडच्या नेत्याला मिळणार? धनंजय मुंडेंना जबरदस्त धक्का देण्याची तयारी

 

शासकीय सदनिकेचा लाभ घेतल्याप्रकरणात माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना खातेमुक्त केलं. त्यानंतर कोकाटेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा अजित पवारांमार्फत दिला.


त्यांच्या रिक्त जागेवर धनंजय मुंडे प्रयत्न करीत असल्याची माहिती आहे. मात्र पक्ष वेगळंच काहीतरी करण्याच्या तयारीमध्ये असल्याचं दिसतंय.

धनंजय मुंडेंना संधी नाही?

संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा उजवा हात होता. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींना जोपर्यंत शिक्षा होत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडेंना कुठलीही संधी मिळणार नसल्याचं राजकीय जाणकार सांगतात. तरीही ते मंत्रिपदासाठी प्रयत्न करत असल्याचं बोललं जातंय. त्यांनी अमित शाहांची घेतलेली भेट त्याचाच एक भाग होता का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धनंजय मुंडे यांना पुन्हा संधी देणार नसेल तर मग नवा चेहरा कोण? पक्षाकडून मंत्रिपदाची संधी कुणाला मिळणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच एक नाव मात्र अग्रक्रमाणे घेतलं जातंय. ते नाव म्हणजे विजयसिंह पंडित. आमदार पंडित हे बीडच्या गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

कोण आहेत विजयसिंह पंडित?

ज्येष्ठ नेते शिवाजीराव पंडित यांचे सुपुत्र तथा माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे बंधू विजयसिंह पंडित हे गेवराईचे आमदार आहेत. पंडित कुटुंब हे कायम पवार कुटुंबाशी एकनिष्ठ आहे. पवार कुटुंबात बंड झाल्यानंतर पंडित कुटुंबाने अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं. २०२४च्या विधानसभा निवडणुकीत विजयसिंह हे बीडच्या गेवराईतून आमदार झाले.

माणिकराव कोकाटे यांच्या जागेवर विजयसिंह पंडित यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असंही अजित पवारांच्या मागे बीड जिल्ह्याचा कारभार पंडितांच्या शिवछत्र या निवासस्थानातून सांभाळला जात असल्याचं बोललं जातं. अजित पवारांनी मंत्रिपदासाठी विजयसिंह यांचं नाव निश्चित केलं तर मात्र धनंजय मुंडेंना हा मोठा धक्का समजला जाईल.

कोकाटेंना अटक वॉरंट

बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेण्याच्या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आणि त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं. यामुळे कोणत्याही क्षणी कोकाटेंना अटक होऊ शकते. मात्र सध्या ते मुंबईत उपचार घेत आहेत.