अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्याला माळेगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या
याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी 305/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 137(2) प्रमाणे 04 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांनी तातडीने तपास पथक तयार केले.
या पथकात पोलीस उपनिरीक्षक तुषार भोर, सहाय्यक फौजदार संजय मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल अमोल वाघमारे व जयसिंग कचरे यांची नेमणूक करण्यात आली. तांत्रिक विश्लेषणातून आरोपी अल्पवयीन मुलीस बीड येथे घेऊन गेला असल्याचे स्पष्ट झाल्याने तपास पथक तात्काळ बीडला रवाना झाले. तेथे आरोपी व अल्पवयीन मुलीस ताब्यात घेण्यात आले.
तपासात आरोपी स्वप्निल पवार याने अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे गुन्ह्यात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (POCSO Act) अंतर्गत कलम वाढ करून आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 16 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
अल्पवयीन मुलीस तिच्या आईच्या ताब्यात सुखरूप सुपूर्त करण्यात आले. या कारवाईमुळे परिसरात गुन्हेगारांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या तातडीच्या कारवाईचे कौतुक होत आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार भोर करीत असल्याची माहिती प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांनी दिली.