बारामती नगरपरिषद निवडणुक प्रचाराची शुक्रवारी सांगता; अजितदादांच्या उपस्थितीत उद्या राष्ट्रवादीची प्रचार सांगता सभा
बारामती: बारामती नगरपरिषदेसाठी शनिवार दि. २० डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तत्पूर्वी शुक्रवार दि. १९ डिसेंबर रोजी निवडणूक प्रचाराची सांगता होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या वतीने उद्या गुरुवार दि. १८ डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रचार सांगता सभा आयोजित करण्यात आली आहे. या निवडणूकीत अजितदादांनी विरोधकांना बरोबर घेतलं आहे. मात्र काही प्रभागांमध्ये चुरशीची लढत होत असल्यामुळे उद्याची सभा महत्वाची ठरेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
बारामती नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराची सांगता उद्या शुक्रवार दि. १९ डिसेंबर रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून अजितदादांच्या प्रमुख उपस्थितीत सांगता सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. बारामती नगरपरिषदेसमोरील शारदा प्रांगणामध्ये उद्या गुरुवारी दि. १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता ही सभा पार पडणार आहे. या सभेत अजितदादा काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
बारामती नगरपरिषदेवर अजितदादांची एकहाती सत्ता राहिली आहे. त्यातच या निवडणुकीत अनपेक्षितपणे विरोधकांनाही सामावून घेण्यात राष्ट्रवादीला यश आले. त्यामुळं निवडणूक एकतर्फी होईल असं चित्र होतं. मात्र राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्यानं काही प्रमाणात नाराजी पाहायला मिळाली. त्यामुळं बारामती शहरातील प्रभाग क्र. ३, ५, १३,१४, १५ आणि १७ मधील लढतींकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या ठिकाणी पक्षाकडून तिकीट नाकारलेल्या नाराजांसह स्थानिक विरोधकांनी जोर लावला आहे. त्यामुळं या प्रभागांमधील निवडणुक चुरशीची होणार आहे.
प्रत्येक निवडणुकीत अजितदादा उमेदवारी अर्ज मागे घेण्यापूर्वी नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढत असतात. मात्र यावर्षी राज्यभरातील निवडणुकांचा व्याप असल्यामुळं अजितदादांना फारसा वेळ देता आला नाही. त्यामुळं उद्या अजितदादांकडून नाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाल्यास चुरशीची प्रभागातील वातावरण फिरू शकतं असा कयास बांधला जात आहे. त्यामुळं उद्याच्या सभेसह अजितदादांच्या दौऱ्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.