दुर्देवी घटना ! 'हुबळीनजिक अपघातात बारामतीतील दांपत्याचा मृत्यू; देवदर्शनाहून येताना काळाचा घाला, दाेन मुले गंभीर जखमी..
येथील श्रायबर डायनामिक्स डेअरी इंडस्ट्रिजमध्ये कार्यरत असलेले अनिल सदाशिव जगताप (वय 50) व त्यांची पत्नी वैशाली अनिल जगताप (वय 45) हे दांपत्य त्यांची दोन्ही मुले अथर्व (वय 24) व अक्षता (वय 20) तिरुपतीला देवदर्शनासाठी गेले होते.
बुधवारी (ता. 3) पहाटे चारच्या सुमारास हुबळीनजिक एका ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने जगताप दांपत्यांची गाडी मागून जाऊन ट्रकवर आदळून हा अपघात झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. या अपघातात अनिल व वैशाली जगताप यांचा मृत्यू झाला. याच गाडीत असलेली दोन्ही मुले जखमी झाली असून त्यांच्यावर हुबळीतील रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले. याच गाडीमध्ये त्यांच्या नातेवाईकांचा एक लहान मुलगाही होता, सुदैवाने त्यालाही फारशी दुखापत झाली नाही.
अनिल जगताप व वैशाली जगताप हे दांपत्य अत्यंत मनमिळावू होते, त्यांच्या अकाली जाण्याने बारामतीतील त्यांच्या मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला. दरम्यान गुरुवारी (ता. 4) सकाळी बारामतीत या दांपत्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष अभिजित जाधव यांनी दिली.