नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पक्षाने मोठी मुसंडी मारली असली, तरी हे यश भाजपच्या मूळ ताकदीचे नसून आयात केलेल्या नेत्यांचे आहे, अशी खोचक टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. भाजपने बाहेरच्या ताकदवान नेत्यांना पक्षात घेऊन स्वतःचा विस्तार केला आहे, त्यामुळे हे यश पक्षाच्या विचारधारेपेक्षा व्यक्तींच्या वैयक्तिक ताकदीवर अधिक अवलंबून असल्याचे विश्लेषण सुप्रिया सुळेंनी केले.
नुकत्याच झालेल्या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीत महायुतीने, विशेषतः भाजपने अनेक जिल्ह्यांमध्ये वर्चस्व राखले आहे. या निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणावर फोडाफोडीचे राजकारण झाले होते. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात अनेक मातब्बर नेत्यांनी राष्ट्रवादी किंवा काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. विदर्भात भाजपला मिळालेल्या मोठ्या यशामागेही स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आयात केलेले चेहरे कारणीभूत असल्याची चर्चा सुरु आहे. या निकालावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी हे यश भाजपमध्ये झालेल्या मोठ्या इनकमिंगमुळे मिळाल्याचे म्हटले.
"या निकालानंतर आत्मचिंतन करायलाच हवं. जे निवडून आलेत त्यांना शुभेच्छा आहेत. पण तुम्ही डेटा पाहिला तर जो जो सत्तेत असतो त्याचांच नगरपालिकेसारख्या स्थानिक निवडणुकांमध्ये विजय होतो. ही काही नवीन गोष्ट नाही. ज्याप्रमाणे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यात आली, मतांचे विभाजन करण्यात आलं त्यानुसार मला निकाल पाहून काही आश्वर्य वाटलं नाही. भाजपच्या १२४ नगराध्यक्षांपैकी कितीतरी बाहेरचे निवडून आले आहेत. साताऱ्यातील दोन्ही राजे आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. आता भाजपमध्ये आहेत. त्यामुळे ही ताकद भाजपची आहे की दोन्ही राजांची आहे याचाही विचार करायला पाहिजे. भाजपने बाहेरच्या ताकदवान लोकांना पक्षात घेऊन आपला पक्ष वाढवला आहे याचाही विचार केला पाहिजे," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.