सीबीएसई दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखांत बदल; सुधारित वेळापत्रक जाहीर!

सीबीएसई दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखांत बदल; सुधारित वेळापत्रक जाहीर!

 

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षेत तीन मार्च २०२६ रोजी होणारे पेपर पुढे ढकलण्यात आले आहे. काही प्रशासकीय कारणांमुळे तीन मार्चला होणाऱ्या काही परीक्षांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून, सुधारित तारखा अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या आहेत.

या संदर्भातील माहिती सीबीएसईने परिपत्रकाद्वारे दिली आहे.

सीबीएसईच्या सुधारित वेळापत्रकानुसार दहावीची तीन मार्चला होणारी परीक्षा आता ११ मार्चला, तर बारावीची तीन मार्चला नियोजित असलेली परीक्षा आता १० एप्रिलला होणार आहे. या दोन परीक्षांव्यतिरिक्त इतर सर्व विषयांच्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. सीबीएसईने सर्व संलग्न शाळांच्या मुख्याध्यापकांना ही माहिती विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत तातडीने पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच सुधारित तारखांनुसार डेटशीटमध्ये आवश्यक बदल करण्यात येत असून, तेच तपशील प्रवेशपत्रांवरही नमूद करण्यात येणार आहेत. परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी शाळा प्रशासन, विद्यार्थी आणि पालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक डॉ संयम भारद्वाज यांनी केले आहे.