नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?

नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?

 

पुणे - नाशिक येथे भाजपा स्वबळावर लढणार आहे तर अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना युतीत निवडणूक लढवणार आहेत. मात्र नाशिकनंतर आता पुण्यातही शिंदेसेना दोन्ही राष्ट्रवादीसोबत युतीत निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. महायुतीच्या जागावाटपात शिंदेसेनेला सन्मानजनक जागा मिळत नसल्याने एकनाथ शिंदे यांचा पक्ष पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीसोबत युती करण्याची शक्यता आहे.

पुण्यात महायुतीतील जागावाटपाचं चित्र अद्याप अस्पष्ट आहे. त्यात शिंदेसेनेला हव्या तेवढ्या जागा भाजपाकडून मिळत नाही. त्या पार्श्वभूमीवर आता पुण्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. पुण्यातील राजकीय परिस्थिती पाहता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याचीही माहिती आहे. त्यात पुण्यातील शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे पुण्यात शिंदेसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र

गेल्या दोन दिवसांत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे पदाधिकारी हे महाविकास आघाडीच्या बैठकीला हजेरी लावत होते. मात्र आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कुणीही उपस्थित राहिले नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेपाठोपाठ पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) दोन्ही एकत्र येण्याच्या चर्चेने जोर धरला असून दोन्ही पक्षाच्या आघाडीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अखेर रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत पुणे आणि पिंपरी दोन्हीकडे एकत्र लढणार असल्याची घोषणा केली. 

पुण्यात काँग्रेस-उद्धवसेना-मनसे एकत्र लढणार

पुण्यात पवारांच्या खेळीने महाविकास आघाडीत फूट पडली. मात्र काँग्रेस आणि उद्धवसेनेच्या शहर पातळीवरील नेत्यांची बैठक काँग्रेस भवनात झाली. या बैठकीत काँग्रेस व मित्रपक्षांना १०० जागा देण्यात आल्या. उद्धवसेनेला ६५ जागा देण्याचे ठरले. उद्धवसेना आपल्या कोट्यातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जागा देईल, असे ठरले आहे.