बारामती नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी आमराई व परिसरातील विविध कामांची केली अचानक पाहणी
बारामती: बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी आज पहाटे आमराई व परिसरातील विविध कामांची अचानक पाहणी केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच पहाटेपासून विविध कामांची पाहणी करत असतात.
तसेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव हेही पहाटेपासून भेटीगाठी घेत असल्यामुळे चर्चेत आहेत. अशातच आता मुख्याधिकारी पहाटेच्या वेळी बाहेर पडल्यानं नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बारामती शहरातील आमराई भागात प्रत्येक निवडणुकीत पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्त्यांची समस्या यांसारख्या अनेक तक्रारी समोर येतात. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी सकाळी प्रत्यक्ष जाऊन वस्तुस्थितीचा आढावा घेतला.
आजच्या पाहणीदरम्यान मुख्याधिकारी भुसे यांनी अनेक कामांचा प्रत्यक्ष आढावा घेत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. मुख्याधिकाऱ्यांच्या या पाहणीत सातत्य राहिल्यास हा परिसर समस्यामुक्त व्हायला वेळ लागणार नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
मुख्याधिकाऱ्यांच्या या पहाटेच्या पाहणीनंतर शहरात नव्या कामकाज पद्धतीची चर्चा रंगू लागली आहे. नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी मुख्याधिकारी स्वतःहून सकाळी लवकर बाहेर पडत असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
आमराई भागातील नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या तत्परतेचे स्वागत केले असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांकडे प्रशासन आता गांभीर्याने पाहत असल्याची भावना व्यक्त होत आहे.