जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुकांचे बिगूल वाजले!

जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुकांचे बिगूल वाजले!

 

नगर पालिका व महापालिका निवडणुकांनंतर राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला. मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे व सचिव सुरेश काकाणी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत निवडणूक वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार राज्यातील 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान, तर 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुकीची घोषणा होताच संबंधित जिल्ह्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

* या जिल्ह्यांत होणार निवडणुका :- राज्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव (उस्मानाबाद) आणि लातूर या 12 जिल्ह्यांत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील संबंधित जिल्ह्यांत मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे.

* निवडणूक कार्यक्रम (महत्त्वाच्या तारखा) :- 

- उमेदवारी अर्ज दाखल : 16 जानेवारी ते 21 जानेवारी

- अर्ज छाननी : 22 जानेवारी

- अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत : 27 जानेवारी, दुपारी 3 वाजेपर्यंत

- चिन्ह वाटप : 27 जानेवारी, दुपारी 3:30 नंतर

- प्रचाराची अंतिम वेळ : 3 फेब्रुवारी, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत

- मतदान : 5 फेब्रुवारी, सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30

- मतमोजणी : 7 फेब्रुवारी, सकाळी 10 नंतर

* आरक्षणाबाबत स्पष्टता :- या निवडणुकांची घोषणा 50 टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समित्यांसाठी करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत कायदेशीर अडथळे टाळून वेळापत्रकानुसार मतदान घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच ग्रामीण राजकारण तापले असून सर्व राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. येत्या काही दिवसांत उमेदवारी अर्ज, प्रचार, जाहीर सभा आणि राजकीय घडामोडींनी जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापणार असल्याचे चित्र आहे.