माळेगाव नगरपंचायतीत उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदासाठी कोणाची निवड होणार याबाबत उत्सुकता शिगेला

माळेगाव नगरपंचायतीत उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदासाठी कोणाची निवड होणार याबाबत उत्सुकता शिगेला

 

माळेगांव : माळेगाव नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जनमत विकास आघाडी यांची सत्ता स्थापन झाल्यानंतर शहराच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः उपनगराध्यक्ष पदावर कोणाची निवड होणार आणि स्वीकृत नगरसेवक म्हणून कोणाला संधी मिळणार, याबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

या निवडणुकीत तब्बल पाच अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवून लक्ष वेधून घेतले होते. निवडणुकीनंतर या सर्व अपक्षांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पाठिंबा दिला. त्यामुळे स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीत या अपक्ष नगरसेवकांचे मत महत्त्वाचे ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

निवडणुकीच्या सांगता सभेत अजित पवार यांनी ज्या उमेदवारांना निवडणुकीत संधी मिळाली नाही, त्यांना स्वीकृत नगरसेवक पदाद्वारे न्याय दिला जाईल, असे स्पष्ट संकेत दिले होते. अंतिम निर्णय अद्यापही गुलदस्त्यात आहे.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुयोग सातपुते नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर आता उपनगराध्यक्षपदासाठी कोणाची निवड होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार कोणाला संधी देणार, याबाबत माळेगावात जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

नगरपंचायतीतील सध्याची सत्तासमीकरणे पाहता, स्वीकृत नगरसेवक पदावर अनुभवी, सामाजिक कार्यात सक्रिय आणि अनुभव असलेली व्यक्ती निवडली जावी, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक या दोन्ही महत्त्वाच्या पदांवर लवकरच निर्णय होण्याची शक्यता असून, तोपर्यंत माळेगावच्या राजकारणात तर्क-वितर्क, चर्चा आणि अंदाजांचे वारे वाहताना दिसत आहेत.