बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांची बसपाचे काळूराम चौधरी यांच्या विरोधात तक्रार; जिवाला धोका असल्याने सशस्त्र पोलिस संरक्षणाची मागणी

बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांची बसपाचे काळूराम चौधरी यांच्या विरोधात तक्रार; जिवाला धोका असल्याने सशस्त्र पोलिस संरक्षणाची मागणी

 

बारामती :- बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव काळूराम चौधरी यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. 

चौधरी यांच्याकडून जिवाला धोका असल्याने सशस्त्र पोलिस संरक्षण मिळावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी काळूराम चौधरी यांनी हे खोटं असल्याचे सांगितले. मुख्याधिकाऱ्यांविरोधात पोलिसांत तसेच न्यायालयात तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर मुख्याधिकारी भुसे यांच्यासह पालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी याप्रकरणी शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांची भेट घेतली. त्यांच्याकडे लेखी तक्रार देण्यात आली. तक्रारीनुसार, चौधरी हे वारंवार नगरपरिषद कार्यालयामध्ये जमाव घेऊन घेऊन येतात. मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात येत शिवीगाळ करणे, मारण्याची धमकी देणे, अॅट्रॉसिटीमध्ये अडकवण्याची धमकी देणे, असे प्रकार केले जात आहेत. चौधरी यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे वर्गणी- रोख रक्कम मागितली. त्यास नकार दिल्यावर त्यांनी पालिकेत कचरा आणून टाकला.

मुख्याधिकाऱ्यांना मारहाण करणार, असे जाहीर वक्तव्य केले, असे या तक्रारीत म्हटले आहे.नगरपरिषदेत दि. ६ रोजी नगरसेवकांच्या स्तरावर अनौपचारिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीशी मुख्याधिकाऱ्यांचा संबंध नसताना चौधरी यांनी त्यांच्या नगरसेवक मुलीस जाणीवपूर्वक बोलावले नाही, सांगितलेल्या कर्मचाऱ्याची बदली केली नाही, असे म्हणत व्हॉट्सअॅप कॉलद्वारे मुख्याधिकाऱ्यांना मारहाण करू,काळे फासू, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू,अशा धमक्या दिल्या. चौधरी यांच्या सांगण्यावरून दि. ७ रोजी नगरपरिषदेत तीन ते चार जण आले. ते मुख्याधिकाऱ्यांना शारीरिक इजा करण्यासाठी, काळे फासण्यासाठी व मारहाणीसाठी आले होते, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. शिवाय चौधरी यांच्या धमकीला घाबरून मुख्याधिकारी पळून गेले, अशा आशयाचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केले गेले. चौधरी यांनी मुख्याधिकाऱ्यांचा वैयक्तिक संपर्क क्रमांक व नाव प्रसारित करून बदनामी केली. मुख्याधिकाऱ्यांना अनोळखी क्रमांकावरून  धमक्या प्राप्त झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. चौधरी यांना पालिकेत येण्यापासून प्रतिबंध करावा तसेच सशस्त्र पोलिस संरक्षण मिळावे,
 अशी मागणी करण्यात आली आहे.मुख्याधिकारी यांनी केलेल्या तक्रारीनुसार शहर पोलिस ठाण्याकडून चौकशी सुरू आहे. मुख्याधिकारी यांना काळे फासण्यासाठी कोण आले होते का? याची तपासणी केली जात आहे. तपासानंतर यासंबंधी पुढील कार्यवाही होईल, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी दिली.

नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत माझी मुलगी निवडून आली.सर्वसामान्य,दलित कुटुंबातील मुलीचे हे यश अनेकांच्या पचनी पडलेले नाही.त्यामुळे दलित नेत्याला बदनाम करण्याचे काम मुख्याधिकारी करीत आहेत. मुख्याधिकारी फोन उचलत नाहीत,ही सार्वत्रिक तक्रार आहे.मग माझेच फोन त्यांनी कसे काय उचलले मुख्याधिकाऱ्यांनीच मला व्हॉट्सअॅप कॉल केले आहेत, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. शहरातील एका अतिक्रमणप्रश्नी त्यांनीच मला पाठपुरावा करायला लावला.मुख्याधिकाऱ्यांनी केलेल्या बदनामीबाबत पोलिसांत तक्रार देणार आहे.त्यांना न्यायालयातही खेचणार असल्याचा इशारा काळूराम चौधरी यांनी दिला.