बारामती नगरपरिषदेच्या गटनेतेपदी संजय संघवी; उपगटनेतेपदी संपदा चौधर, तर मुख्य प्रतोदपदी विशाल हिंगणे यांची निवड

बारामती नगरपरिषदेच्या गटनेतेपदी संजय संघवी; उपगटनेतेपदी संपदा चौधर, तर मुख्य प्रतोदपदी विशाल हिंगणे यांची निवड

 

बारामती: बारामती नगरपरिषदेच्या गटनेतेपदी संजय संघवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर उपगटनेतेपदी संपदा सुमित चौधर यांची निवड करण्यात आली असून मुख्य प्रतोदपदाची जबाबदारी विशाल भानुदास हिंगणे यांच्यावर देण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नगरसेवकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात माहितीही देण्यात आली आहे.

बारामती नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदासह स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी शुक्रवार दि. १६ जानेवारी रोजी होणार आहेत. तत्पूर्वी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची एक बैठक पार पडली. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार गटनेतेपदी संजय वालचंद संघवी यांची निवड करण्यात आली आहे. तर उपगटनेतेपदी संपदा चौधर आणि मुख्य प्रतोदपदी विशाल हिंगणे यांची निवड करण्यात आली. दरम्यान, या निवडीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत नोंदणीही करण्यात आली.

दरम्यान,  संजय संघवी यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने एक अनुभवी चेहरा दिला आहे.  संघवी यांचा प्रशासकीय कामातील अनुभव, संघटनात्मक कौशल्य आणि नगरसेवकांशी असलेला समन्वय या गोष्टी लक्षात घेता ही संधी देण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे सर्वच नगरसेवक एकजूटीने काम करतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.