कारभारी स्मृतिचषक वक्तृत्व स्पर्धेत सान्वी महाडीक व त्रिशा धापटे यांचे घवघवीत यश
बारामती:- कसबा- बारामती येथील धों.आ. सातव (कारभारी) हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने आयोजित कारभारी स्मृतिचषक तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या २८ व्या वर्षात विद्या प्रतिष्ठानचे न्यू बालविकास मंदिर,पिंपळी या शाळेच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले.
कारभारी स्मृतिचषक वक्तृत्व स्पर्धा गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून सातत्याने आयोजित करण्यात येत असून,या स्पर्धेचे आयोजन अत्यंत नेटके,शिस्तबद्ध व पारदर्शक पद्धतीने केले जाते. स्पर्धा जरी तालुकास्तरीय असली,तरी तिचे आयोजन, परीक्षकांची निवड व गुणांकनाची पद्धत राज्यस्तरीय स्पर्धेच्या तोडीस तोड असल्याने या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.त्यामुळे या स्पर्धेत पारितोषिक मिळवणे ही स्पर्धकांसाठी अत्यंत अभिमानाची बाब मानली जाते.
या स्पर्धेत सान्वी महाडीक हिने “माझे संविधान-माझा अभिमान” या विषयावर प्रभावी,अभ्यासपूर्ण व आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण करत परीक्षक व उपस्थितांची विशेष दाद मिळवली.तसेच शाळेची दुसरी विद्यार्थिनी त्रिशा धापटे हिने “नागरी वस्तीतील बिबट्याचा वावर- एक समस्या” या विषयावर समाजाभिमुख व विचार प्रवर्तक भाषण सादर केले.
या तालुकास्तरीय स्पर्धेत विविध शाळांमधील सुमारे १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
त्यामधून लहान गट (पाचवी ते सातवी) या गटात सान्वी महाडीक व त्रिशा धापटे या दोघींनीही प्रथम क्रमांकाचे सांघिक बक्षीस पटकावून अनेक शाळांमधून विजयश्री खेचून आणली.
बक्षीस वितरण समारंभ संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय (काकाजी)धोंडीबा सातव, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.विजयराव बर्गे,ॲड.अजित शेरकर, नगरसेविका ॲड.अश्विनी सातव,मंगलताई जगताप, शर्मिलाताई ढवाण आदी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
या यशामागे सान्वीची आई प्रिया यांनी घेतलेली सातत्य पूर्ण तयारी मोलाची ठरली. शाळेच्या वतीने ज्योती दिसले मॅडम यांनी मार्गदर्शन केले, लीला शेट्टी मॅडम यांनी प्रोत्साहन दिले,तर शाळेच्या मुख्याध्यापिका तनुश्री गोरे मॅडम यांनी दोन्ही विद्यार्थिनींचे अभिनंदन करून विशेष कौतुक केले.
या घवघवीत यशामुळे सान्वी महाडीक व त्रिशा धापटे या दोघींचे शालेय जीवनात नाव उज्वल झाले असून शाळेच्या वतीने त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली आहे.