पंधरा वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी वाईच्या सत्र न्यायालयाने आरोपीला सुनावली वीस वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा !

पंधरा वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी वाईच्या सत्र न्यायालयाने आरोपीला सुनावली वीस वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा !

 

वाई: खंडाळा तालुक्यातील शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील पंधरा वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेऊन जबरदस्तीने शरीरसंबंध केल्याप्रकरणी किरण राजाराम वसेकर (वय 20) याला बाललैगिंक अत्याचार प्रतिबंध कायदा (पोक्सो) अंतर्गत वाई येथील अतिरिक्त सञ न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी दोषी धरत 20 वर्ष सश्रम कारावास व 19 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 2 महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.

शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका गावात पंधरा वर्षीय मुलगी कुटुंबियांसमवेत राहत होती. दरम्यान, संबंधित 15 वर्षीय मुलीबरोबर किरण वसेकर याने ओळख निर्माण करीत घरामध्ये जबरदस्तीने शरीरसंबंध करीत त्यानंतर फुस लावून ढोकी (जि. धाराशिव) येथे नेले व पञ्याच्या शेडमध्ये अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने 28 जानेवारी 2021 सकाळी 8 ते 2 फेब्रुवारी 2021 रोजीच्या कालावधीत शरीरसंबंध केले होते.

यावेळी मुलीच्या मावशीने शिरवळ पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी वरुन किरण वसेकर याच्या विरुध्द अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा, बलात्कार केल्याप्रकरणी व बाललैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा 6, 8, 12 अन्वये गुन्हा दाखल केला होता. किरण वसेकर याला 3 फेब्रुवारी रोजी शिरवळ पोलीसांनी अटक केली. या घटनेचा तपास तत्कालीन फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयामध्ये सादर केले होते.

त्यानुसार वाई येथील अतिरिक्त सञ न्यायाधीश आर.एन.मेहरे यांच्या न्यायालयासमोर सुनावणी पार पडली. या घटनेमध्ये 9 साक्षिदार तपासत सरकारी वकील महेश शिंदे यांनी केलेला युक्तिवाद व सादर केलेले पुरावे, साक्षीदार ग्राह्य मानत वाई येथील अतिरिक्त सञ न्यायाधीश आर.एन.मेहरे यांनी आरोपी किरण वसेकर याला बलात्कार प्रकरणी व बाललैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 6, 8, 12 (पोक्सो) अन्वये दोषी धरत वीस वर्ष सश्रम कारावास व 19 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.

याकामी सरकारी वकील महेश शिंदे यांना तपासी अधिकारी तथा तत्कालीन फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, शिरवळ पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नाना धायगुडे, पोलीस अंमलदार सचिन भोसले, सचिन वीर, शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार सुधाकर सपकाळ, सहायक फौजदार शिवाजीराव पांब्रे, अविनाश डेरे, पोलीस अंमलदार किर्तीकुमार कदम, भुजंग काळे, हेमा कदम, प्रितम नाळे यांनी सहकार्य केले.