पुण्यात गुन्हेगारांना उमेदवारी दिल्याच्या आरोपावर अजित पवारांचे स्पष्टीकरण; म्हणाले, “काही जागा आम्ही…”

पुण्यात गुन्हेगारांना उमेदवारी दिल्याच्या आरोपावर अजित पवारांचे स्पष्टीकरण; म्हणाले, “काही जागा आम्ही…”

 

राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यादरम्यान पुणे शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून गुन्हेगारांच्या कुटुंबातील एकूण चार सदस्यांना उमेदवारी दिल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. या चार पैकी तीन या महिला उमेदवार असून दोघी तर कारागृहातून निवडणूक लढविणार आहेत. दरम्यान आज अजित पवारांनी याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

नाना पेठेतील आयुष कोमकर खून प्रकरणातील आरोपी आणि सध्या तुरुंगात असलेल्या सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांच्यासह कुख्यात गुंड गजानन मारणे याची पत्नी जयश्री मारणे यांनी पक्षाच्या अधिकृत ‘एबी’ फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावरून अजित पवारांना टीकेचा सामना करावा लागत आहे.

अजित पवारांचे स्पष्टीकरण

याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला असता अजित पवार म्हणाले की, “तुम्ही आजपर्यंतच्या सर्व निवडणुका आठवा. आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया- सचिन खरात यांच्याबरोबर युती झालेली आहे. काही जागा आम्ही त्यांना सोडलेल्या आहेत. मी त्यासंदर्भात वेगळी पत्रकार परिषद घेणार आहे. आपल्या सगळ्यांना माझी कामाची पद्धत माहिती आहे. आम्ही ज्यांच्याबरोबर युती करतो, त्यांना काही जागा सोडल्यानंतर त्यांनी त्या जागा कुणाला द्याव्यात हा त्यांचा निर्णय आहे.” असे अजित पवार म्हणाले.

शेवटच्या क्षणापर्यंत एबी फॉर्मचे वाटप, उमेदवार नाकारले जाणे असे, गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे डबल एबी फॉर्म, नाराजी अशी गोष्टी घडल्या, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

सचिन खरात काय म्हणाले?

दरम्यान अजित पवारांनी गुन्हेगारांना त्यांच्या पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी सचिन खरात यांच्या आरपीआय पक्षाकडे त्यांनी बोट दाखवले. याबद्दल सचिन खरात यांना प्रश्न विचारला असता, अजित पवारांशी चर्चा केल्यानंतर यावर सविस्तर बोलेन अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली .

शरद पवार यांच्या पक्षाबरोबर युती

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार याबद्दलही अजित पवारांनी महत्त्वाचे विधान यावेळी केले. अजित पवार म्हणाले की, आमची आरपीआय-सचिन खरात यांच्याबरोबर युती झाली आहे. तुतारी म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर देखील आम्ही पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये जागा लढवत आहोत. शिवसेना (शिंदे) पक्षांच्या काही नेत्यांबरोबर देखील चर्चा केली आहे आणि आज त्यांच्याबरोबर बसून काही मार्ग निघतोय का हे पाहणार आहोत, असे अजित पवार म्हणाले. तसेच उर्वरित राज्यातील इतर भागांमध्ये स्थानिक सहकाऱ्यांना अधिकार दिले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.