"वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही, अजित पवारांनी..."; देवेंद्र फडणवीसांचे सडेतोड मत

"वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही, अजित पवारांनी..."; देवेंद्र फडणवीसांचे सडेतोड मत

 

महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीमधील मित्रपक्षांमधील कलह चव्हाट्यावर येताना दिसतो आहे. भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. अजितदादांनी पुण्यात बोलताना भाजपावर शेलक्या शब्दांत टीका केली होती. त्यानंतर आज भाजप आमदार आशिष शेलार यांनी सावरकरांच्या मुद्द्यावरून अजित पवारांना सुनावले आहे. सावरकरांचे विचार मान्य असतील तर सोबत या, नाहीतर तुमच्याशिवाय पुढे जाऊ, अशा शब्दांत शेलारांनी अजित पवारांना ठणकावले आहे. आता याच मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.

फडणवीसांची रोखठोक भूमिका

देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभांचा धडाका सुरु असताना त्यांना पत्रकार मंडळींनी वीर सावरकरांच्या मुद्द्यावरून प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी सूचक विधान केले. "मला असं वाटतं नाही की वीर सावरकरांच्या विचारांचा अजित पवारांनी विरोध करण्याचे काहीच कारण आहे. त्यांनी याआधी कधीही वीर सावकरांच्या विचारांचा विरोध केलेला नाही. त्यांच्याकडून कधी विरोध झाला असेल तर मला त्याची कल्पना नाही. पण आमची भूमिका पक्की आहे. वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही," अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी रोखठोक भूमिका मांडली.

वादाची सुरुवात कुठून झाली?

या वादाची सुरुवात अजित पवार यांनी पुण्यात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेतून झाली होती. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना अजित पवारांनी भाजपच्या काही धोरणांवर आणि स्थानिक नेतृत्वावर बोचरी टीका केली होती. पुण्याच्या विकासकामांच्या श्रेयवादावरून त्यांनी भाजपला लक्ष्य केले होते. अजित पवारांच्या या टीकेला आधी रवींद्र चव्हाण आणि त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यापाठोपाठ आज आशिष शेलार यांनी या वादात सावरकरांचा मुद्दा घेत अजित पवारांना इशारा दिला.

आशिष शेलार काय म्हणाले होते?

"आमचा पक्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांवर चालणारा आहे. रवींद्र चव्हाण म्हणालेच आहेत की आम्ही सावरकरांचे भक्त आहोत. सावरकरी विचारांवर चालणारे लोक आहोत. त्यामुळे अजित पवारांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील. याल तर तुमच्या बरोबर, न याल तर तुमच्याविना आणि विरोधात शिरलात तर तुमच्या विरोधात... आम्ही आमचे काम करतच राहू," असा इशारा आशिष शेलार यांनी दिला होता.