भाजप नेते आक्रमक होताच अजितदादा म्हणाले, ‘माझ्या वक्तव्याचा…’

भाजप नेते आक्रमक होताच अजितदादा म्हणाले, ‘माझ्या वक्तव्याचा…’

 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या राजवटीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर आरोप केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आक्रमक भूमिका घेत पवार यांना प्रत्युत्तर दिले. याबाबत बोलणे टाळत पवार यांनी आपण स्थानिक भाजप नेत्यांविरोधात बोललो असताना संपूर्ण भाजपला बोलल्याचे माझे वक्तव्य वेगळ्या पद्धतीने फुगवून दाखविले. वक्तव्याचा विपर्यास केला. त्यामुळे भाजप नेते बोलले. आमच्यातील अंतर कसे वाढेल हे माध्यम पाहत आहेत असे म्हणत आरोप-प्रत्यारोपांचे आणि दोन्ही पक्षात वाढलेल्या तणावाचे खापर पवारांनी माध्यमांवर फोडले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीतील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि घटक पक्षांच्या उमेदवारांची बैठक अजित पवार यांनी मंगळवारी कासारवाडीत घेतली. त्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजित पवारांना बरोबर घेतल्याचा पश्चाताप होत असल्याचे म्हटले होते. सिंचन प्रकल्पातील ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.  त्याचा निकाल अद्याप लागला नाही, असे वक्तव्य भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. आमच्यासोबत राहायचे असेल, तर अजित पवारांना स्वातंत्रवीर सावकारांना मानावे लागेल, असे वक्तव्य आशिष शेलार यांनी केले असल्याबाबत विचारले असता, अजित पवारांनी उत्तर देणे टाळले. मी केलेले वक्तव्य वेगळ्या पद्धतीने फुगवून दाखवले. मी स्थानिक भाजपच्या कारभाराबद्दल बोललो. मात्र, संपूर्ण भाजप बद्दल बोलल्याचे दाखविले. त्यामुळे भाजपचे प्रमुख नेते बोलले. स्थानिक नेत्यांबाबत बोललो होतो. त्यांच्याबाबत बाेलणारच आहे, असे पवार यांनी सांगितले.

महापालिकेपुरते बोललो

‘केंद्र सरकारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उत्तम काम चालले आहे. राज्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम करत आहे. एकनाथ शिंदे आणि आम्ही सरकारमध्ये आहोत. तिथे कोणतीही अडचण नाही. मात्र, महापालिकेच्या निवडणुकीत मी महापालिकेपुरतो बोलतो. गेल्या नऊ वर्षात नियाेजन शून्य कारभार झाला. महापालिकेला कर्जबाजारी केले. निविदेमध्ये रिंग केली जाते. साेईच्या अटी-शर्ती टाकल्या जातात. याचे पुरावे देखील मी दिले आहेत. लाच घेतल्याप्रकरणी भाजपच्या स्थायी समिती अध्यक्षाला अटक झाली’, असे पवार म्हणाले.

सर्व उमेदवारांनी एकोप्याने प्रचार करावा

‘सर्व उमेदवारांनी एकाेप्याने प्रचार करावा. आचारसंहितेचा भंग हाेणार नाही, याची काळजी घ्यावी. काेणत्याही समाजाच्या भावनांना ठेच पाेहचेल असे वक्तव्य करू नये’, अशी सूचना पवार यांनी उमेदवारांना केली. ‘ज्या उमेदवारांच्या जिवाला भिती आहे. त्यांनी संरक्षणासाठी अर्ज दिला असेल, त्यांना पोलिसांनी संरक्षण द्यावे’ असेही ते म्हणाले.

‘स्थायी समितीत काय करायचे ते केले आणि आमदार झाला’

भाजपने महापालिका कर्जबाजारी केली. ठेवी मोडल्या आहेत. ४० हजार कोटी रुपयांची कामे कुठे झाली आहेत, याची उत्तरे द्यावीत. त्याला (महेश लांडगे) नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष केले. स्थायी समितीत काय करायचे ते केले आणि आमदार झाला. आता संपत्ती कशी वाढली. दादागिरी किती वाढली आहे, अशी टीका नाव न घेता आमदार लांडगे यांच्यावर केली.

‘कितीजण आले गेले, फरक पडत नाही’

‘पान टपरी चालक अण्णा बनसोडे यांना विधानसभा उपाध्यक्ष केले. अनेकांना वेगवेवेगळी पदे दिली. पण, माणुसकी, जाणीव ठेवायची की नाही हे ज्याच्या त्याच्या हातात आहे. असे कितीजण आले, गेले मला याचा काही फरक पडत नाही. सरड्या सारखे रंग बदलणाऱ्यांना घरी बसावा’ असे म्हणत पवार यांनी नाव न घेता संजोग वाघेरे यांच्यावर टीका केली.