"अजित पवार हेच महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे 'आका', स्वतःच्या लेकाचे पराक्रम पहा"; भाजपा आमदार लांडगेंचा हल्ला, पार्थ पवारांवरून डिवचले
अजित पवारांनी पिंपरी चिंचवड येथील सभेत बोलताना भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्याला उत्तर देताना आमदार महेश लांडगे म्हणाले, "आधी स्वतःच्या लेकाचे पराक्रम बघा. ते स्वतः आका आहेत, हे त्यांनी जाहीर करावे. मला पिंपरी चिंचवडचा आका म्हणत आहेत. मूळात अजित पवार हेच महाराष्ट्राचे आका आहेत", अशी टीका आमदार महेश लांडगे यांनी केली.
पिंपरी चिंचवडमधील भ्रष्टाचाराचा आका संपवायचा आहे, अशी टीका अजित पवारांनी सभेत बोलताना केली होती. त्यावर महेश लांडगे म्हणाले, "सध्या अजित पवार यांचा अहंकार बोलत आहे. ते नैराश्यात आहेत."
"...म्हणून अजित पवार भाजपासोबत आले"
अजित पवारांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर उत्तर देताना आमदार महेश लांडगे म्हणाले, "स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी अजित पवार भाजपासोबत आले आहेत. अजित पवारांनी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करू नयेत."
"मुलगा पार्थ पवारांचे पराक्रम पहा. जे स्वतःच्या काकाचे होऊ शकले नाहीत, ते पिंपरी चिंचवडचे होतील का? आमच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करायचे असतील, तर मी महापालिका प्रशासन आणि अजित पवार समोरासमोर यावं. मग सर्व उत्तरे मिळतील", असा पलटवार महेश लांडगेंनी केला.