"राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याचा हा परिणाम..."; हिदायत पटेल हत्येवरून काँग्रेसची टीका

"राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याचा हा परिणाम..."; हिदायत पटेल हत्येवरून काँग्रेसची टीका

 

राज्यात कोयता गँग, ड्रग्ज माफिया, रेती माफिया, लँड माफिया, आका यांचे पेव फुटले आहे. गावागावात गुन्हेगारीचे लोण पसरले असून अकोल्यातील काँग्रेस नेते हिदायत पटेल यांची झालेली हत्या हे राज्यातील कायदा सुव्यवस्था किती रसातळाला गेली आहे, याचे उदाहरण आहे. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याचा हा परिणाम आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. या हल्ल्यातील सर्व गुन्हेगारांना तातडीने अटक करून कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. अमरावती येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी सर्वप्रथम काँग्रेस नेते हिदायत पटेल यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

"ही निवडणूक अमरावती महानगरपालिकेची जशी आहे, तशीच राज्यातील इतर २९ महानगरपालिकेची आहे. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत पैसा फेक तमाशा देख, हे वगनाट्य  सत्ताधारी पक्षाकडून खेळले गेले. कायदा सुव्यवस्था गुंडाळून ठेवली आहे, निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षांच्या हाताचे खेळणे बनून राहिला आहे, प्रशासन सत्ताधाऱ्यांना मदत करत आहे. बोगस मतदान, पैशाचे प्रचंड वाटप सुरु आहे. राज्यात प्रशासन नावाचे काही चालत नाही. कुणाचाही वचक राहिलेला नाही," असे सपकाळ म्हणाले.

"जे नगर पंचायत निवडणुकीत झाले, तेच महानगरपालिका निवडणुकीत होत आहे. घोडेबाजाराला ऊत आला असून अर्ज मागे घेण्यासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना धमकावले जात आहे, दबाव आणला जात आहे. बिनविरोध निवडीसाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री गुंडगिरीवर उतरले आहेत.विधानसभेचे अध्यक्ष संविधानाचे, सभागृहाचे कस्टोडीयन आहेत पण त्यांच्या घरातील तीन उमेदवार बिनविरोध व्हावे यासाठी ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर उभे होते, त्यांनी दमदाटची केली,धमक्या दिल्या, त्यांचे वागणे हे विचित्र व विकृत होते. सत्ताधारी पक्षाने लोकशाही गुंडळून ठेवली आहे," अशी टीका त्याने केली.

भाजप अन् एमआयएम एकाच नाण्याच्या दोन बाजू

"भारतीय जनता पक्ष व एमआयएम हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. माजी मुख्यमंत्री व भाजपा नेते अशोक चव्हाण हे एमआयएमला उमेदवारी देण्यास सांगत आहेत. एमआयएम ही भाजपीची बी टीम आहे," असा आरोपही सपकाळ यांनी केला.