"तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; एमआयएम सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
नाशिक - माझ्यावर हिंदुत्वावरून जे टीका करतायेत त्या भाजपाने त्यांच्या फडक्यावरील हिरवा रंग काढावा आणि माझ्यावर बोलावे. भाजपा हा उपऱ्यांचा पक्ष झाला आहे. रामाने रावणाचा वध केला, तो रावणही भाजपात आला तरी त्याला पक्षात घेतील असं सांगत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर घणाघात केला. नाशिक येथे उद्धवसेना-मनसे शिवशक्ती युतीची पहिली सभा पार पडली. त्या सभेतून ठाकरेंनी भाजपा महायुतीचा समाचार घेतला.
या सभेत उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वावरून भाजपावर टीका केली. ते म्हणाले की, भाजपाने पाठीत वार केला म्हणून मी काँग्रेससोबत गेलो होतो. मी काँग्रेससोबत गेलो तर उद्धव ठाकरेंनी हिंदु्त्व सोडले असं म्हटलं मग आता भाजपाने अकोटमध्ये एमआयएमसोबत युती केली तेव्हा तुमचे काय सुटले? अंबरनाथमध्ये जिथे शिवमंदिर आहे तिथे पायपुसणे फेकून दिले आणि काँग्रेसशी युती केली. भाजपात समविचारी म्हणून चोर, भ्रष्टाचार, गुंडांना प्रवेश दिला जातोय. भ्रष्टाचार तितुका मेळवावा, भाजपा पक्ष वाढवावा. अभद्र युती करून सत्ता आणली जातेय असा आरोप त्यांनी केला.
तसेच भाजपाचं हिंदुत्व हे खरे हिंदुत्व आहे की चुनावी हिंदुत्व आहे? राम मंदिर केले म्हणून तुम्ही डंका पिटता, पण प्रभू रामचंद्र जिथे तपस्येला बसले होते, नाशिक ही पुण्यभूमी आहे. पर्णकुटी कुठे होती, ही सगळी झाडे तुम्ही कापणार असाल तर प्रभू राम कुठे बसले होते हे कुणी विचारले तर त्यांना काय सांगणार? संपूर्ण सत्यानाश करायचा. धर्माची पट्टी बांधायची आणि अंधभक्त करायचे, तुमच्यावर मोहिनी टाकून स्वप्नात गुंगवून टाकायचे. ज्या देवेंद्र फडणवीस यांनी हे शहर दत्तक घेतले होते. राजकारणात ज्यांना पोरं होत नाहीत त्यांना आमची पोरं दत्तक घ्यावी लागतायेत ते शहर काय दत्तक घेणार? आम्ही मोठी केलेली माणसे गेली असतील पण ज्यांनी मोठी केली ती साधी माणसे आमच्यासोबत आहेत असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
दरम्यान, आम्ही दोघे भाऊ एकत्र आलो, त्याने तुमच्या पोटात गोळा का आला? जेव्हा एकत्र नव्हतो तेव्हा एकत्र का येत नाही असा प्रश्न विचारत होते, आता एकत्र आल्यावर का एकत्र आला असं विचारतात. आमच्या अस्तित्वाची चिंता तुम्ही करू नका. शिवसेनेला ६० वर्ष होतील. अनेक निवडणुका लढवल्या, त्यात अनेक पराभव पचवले. विजय फार थोडा नशिबी आला पण पराभव होऊनही शिवसेना संपली नाही. मात्र ही निवडणूक शहरातील नागरिकांचं पुढचं आयुष्य कसं असणार आहे आणि त्यांचे अस्तित्व कसं असणार आहे हे ठरवणारी ही निवडणूक आहे. भाजपानं हिंदुत्वाचा बुरखा घातलाय. जर हा बुरखा नसता तर तपोवनातील झाडे कापून ती जागा बिल्डरला दिली नसती. तपोवनाचे ज्यांना महत्त्व नाही. आरेचे जंगल कापले जातंय, ताडोबा जंगलातील जागा खाणीसाठी देतायेत. आमचं हिंदुत्व हे व्यापक आहे, राष्ट्रीयत्व आहे. सगळे आमच्यासोबत आहेत असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याच्या नशिबी काय आलंय...
भाजपाच्या नशिबी काय आलंय, आधी आमच्यात असताना भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. सलीम कुत्तासोबत फोटो दाखवला आणि त्याला पक्षात घेतले. पक्ष वाढवायला तुम्हाला सगळे चालते. बरबटलेली माणसे पक्षात घ्यायची आणि त्यांना डोक्यावर घेऊन नाचायचे हे निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांच्या नशिबी आलंय, हा भाजपा तुम्हाला अपेक्षित होता. जे गेलेत त्यांचे नशीब त्यांच्याजवळ पण मला भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे वाईट वाटते. त्यांना प्रवेश दिल्यावर आमच्या देवयानी ताईंना रडू आवरेना, तुम्ही तुमचे काम निष्ठेने करतायेत. पण तुम्ही ज्या पक्षाची निष्ठा बाळगतायेत तो पक्ष आज उपऱ्यांचा झाला आहे. भाजपा दलालांचा पक्ष झाला आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
हा वचननामा नव्हे तर ठाकरेंचा शब्द
वचननामा हा केवळ छापलेला कागद नाही तर तो आमचा ठाकरेंचा शब्द आहे. ही मोदी गॅरंटी नाही. ठाकरे जे बोलतात ते करतात. आम्ही कुणाच्या कामाचे श्रेय घेतले नाही. मशाल तुमच्या हृदयात पेटली पाहिजे. ज्यापद्धतीने या लोकांचा कारभार सुरू आहे बिनविरोध निवडणुका झाल्यात. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घरात ३ उमेदवारी दिली आणि समोरच्याने उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी निवडणूक आयोगाला सामील झाला. आम्ही जरा कुठे काय केले निवडणूक आयोग हातोडा घेऊन पुढे येतो परंतु या लोकांनी काहीही केले तरी काही होत नाही. निवडणूक आयुक्त शेपूट घालून बसले आहेत. ही लोकशाही नाही झुंडशाही आहे. जर आज आपण उठलो नाही तर इंग्रजांपेक्षा जास्त गुलामगिरीत आपल्याला राहावे लागेल असं उद्धव ठाकरे म्हणाले.