लाडकी बहीण योजनेत मोठा ट्विस्ट! काही महिलांना ४५०० तर काहींना फक्त १५००… तुम्ही कुठल्या यादीत?
मुंबई: महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक सुखद बातमी मिळाली आहे. राज्य सरकारने या योजनेअंतर्गत थकित असलेल्या तीन महिन्यांच्या हप्त्यांचा एकत्रित लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास विभागाकडून याबाबतची माहिती देण्यात आली असून, या निर्णयामुळे लाखो महिलांना आर्थिक आधार मिळण्याची अपेक्षा आहे. विशेषतः ई-केवायसी प्रक्रियेमुळे हप्ते रखडलेल्या लाभार्थींना याचा मोठा फायदा होईल.
या योजनेच्या अंतर्गत मासिक १५०० रुपये हप्ता दिला जातो. मात्र, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे हप्ते अनेक महिलांना मिळाले नव्हते. याचे मुख्य कारण ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न होणे हे होते. परिणामी, लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास विलंब झाला. काही महिलांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे जाऊन तक्रारी नोंदवल्या, तर काही ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलनेही केली.
४५०० रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातील
या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केल्यानंतरही हप्ते न मिळाल्याने त्यांचा संताप अनावर झाला होता. अशा परिस्थितीत विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आणि संबंधित महिलांच्या घरी जाऊन चौकशी करण्याचे निर्देश जारी केले. तसेच, नियमांचे उल्लंघन करून सादर केलेल्या अर्जांची सध्या तपासणी सुरू आहे.
राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसार, या थकित हप्त्यांचा एकत्रित लाभ फेब्रुवारी महिन्यात दिला जाईल. ज्या महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते मिळाले नव्हते, त्यांना एकूण ४५०० रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातील. याशिवाय, काही लाभार्थींना जानेवारी महिन्यात केवळ एक हप्ता मिळाला होता.
निवडणूक आयोगाकडे तक्रार
कारण, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. आयोगाने आगाऊ हप्ते देण्यास मनाई केल्यामुळे जानेवारीत फक्त एक हप्ता वितरित करण्यात आला. आता या महिलांना जानेवारी आणि फेब्रुवारीचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, ज्या महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते आधीच मिळाले आहेत, त्यांना जानेवारीचा १५०० रुपयांचा हप्ता नियमितपणे दिला जाईल.
१५०० रुपयांवरून २१०० रुपयांपर्यंत वाढवण्याचे संकेत
या योजनेच्या भविष्यातील शक्यतांबाबतही चर्चा सुरू आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंत यांनी मासिक हप्ता १५०० रुपयांवरून २१०० रुपयांपर्यंत वाढवण्याचे संकेत दिले होते. हा बदल झाल्यास राज्यातील लाखो महिलांना अधिक आर्थिक दिलासा मिळेल.