सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारताच रोहित पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेस च्या अध्यक्षपदाबाबत मोठं भाष्य; “काही नेत्यांची इच्छा…”

सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारताच रोहित पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेस च्या अध्यक्षपदाबाबत मोठं भाष्य; “काही नेत्यांची इच्छा…”

 

मुंबई: अजित पवारांचं काही दिवसांपूर्वी विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आज (१० फेब्रुवारी) सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून पदाचा पदभार स्वीकारला.

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, यावेळी रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत मोठं भाष्य केलं आहे.

‘उपमुख्यमंत्री पदासह सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदीही लवकरच विराजमान व्हावं, पण ही काही नेत्यांची इच्छा नसली तरी राज्यभरातील कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे’, असं रोहित पवार यांनी म्हटलं. दरम्यान, रोहित पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

रोहित पवारांनी काय म्हटलं?

“ज्या खुर्चीत बसून अजितदादा सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करायचे, त्याच खुर्चीत आज सुनेत्राकाकींना पाहून मनात एकाच वेळी आनंद आणि दुःख अशा संमिश्र भावनांचा कल्लोळ उठलाय. या खुर्चीत आज अजितदादा नाहीत याचं अतीव दुःख आहे, पण सुनेत्राकाकी आहेत याचा आनंदही आहे. अजितदादांची उणीव कदापि भरुन काढता येणार नाही. पण सुनेत्राकाकी या अजितदादांच्या शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचाराने काम करताना राज्यभरातील सामान्य माणूस आणि त्याचा विकास हेच ध्येय ठेवून काम करतील, याचा पूर्ण विश्वास आहे. त्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा!”, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवारांनी काय म्हटलं?

“आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे. अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला, तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे. दादांची कार्यशैली, निर्णयक्षमता आणि लोकांशी असलेले आत्मीय नाते, हेच बळ घेऊन मी पुढील वाटचाल करणार आहे. त्यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्णत्व देणे, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणे, हीच माझी प्राथमिकता असेल. दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि अधिक सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की करेन. या कठीण प्रसंगी जनतेने दिलेले प्रेम, आधार आणि विश्वास हेच माझे सामर्थ्य आहे. त्यांच्या स्मृतीपुढे आज मी एकच वचन देते की, महाराष्ट्राच्या हितासाठी निष्ठेने आणि समर्पणाने कार्य करत राहीन”, असं सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर म्हटलं आहे.