अजितदादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही; पदभार स्वीकारताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भावूक पोस्ट
मुंबई: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा शपथविधी पार पडला, त्यानंतर आज, १० फेब्रुवारी रोजी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. मुंबई येथील श्री सिध्दिविनायक गणपती मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारला. दरम्यान यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली आहे.
सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत आगामी काळात उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना त्यांची काय भूमिका असेल याबद्दल भाष्य केले आहे. सुनेत्रा पवार म्हणाल्या की, “आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे. अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला, तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे. दादांची कार्यशैली, निर्णयक्षमता आणि लोकांशी असलेले आत्मीय नाते, हेच बळ घेऊन मी पुढील वाटचाल करणार आहे. त्यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्णत्व देणे, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणे, हीच माझी प्राथमिकता असेल.”
राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कारकिर्दिला सुरूवात करत असताना सुनेत्रा पवारांनी अजितदादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही असेही म्हटले. “दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही; पण त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि अधिक सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की करेन. या कठीण प्रसंगी जनतेने दिलेले प्रेम, आधार आणि विश्वास हेच माझे सामर्थ्य आहे. त्यांच्या स्मृतीपुढे आज मी एकच वचन देते की, महाराष्ट्राच्या हितासाठी निष्ठेने आणि समर्पणाने कार्य करत राहीन.”
रोहित पवारांची पोस्ट
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. “ज्या खुर्चीत बसून अजितदादा सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करायचे, त्याच खुर्चीत आज सुनेत्राकाकींना पाहून मनात एकाच वेळी आनंद आणि दुःख अशा संमिश्र भावनांचा कल्लोळ उठलाय. या खुर्चीत आज अजितदादा नाहीत याचं अतीव दुःख आहे पण सुनेत्राकाकी आहेत याचा आनंदही आहे,” असे रोहित पवार म्हणाले आहेत.
“अजितदादांची उणीव कदापि भरुन काढता येणार नाही पण सुनेत्राकाकी या अजितदादांच्या शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचाराने काम करताना राज्यभरातील सामान्य माणूस आणि त्याचा विकास हेच ध्येय ठेवून काम करतील, याचा पूर्ण विश्वास आहे. त्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा! तसंच उपमुख्यमंत्री पदासह त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदीही लवकरच विराजमान व्हावं, ही काही नेत्यांची इच्छा नसली तरी राज्यभरातील लाखो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे, त्यामुळं तीही त्या पूर्ण करतील, असा विश्वास आहे,” असेही रोहित पवार म्हणाले आहेत.