‘अजितदादांशी फोनवर शेवटचं बोलणं काय झालं होतं?’ प्रफुल्ल पटेल यांनी दिलं उत्तर, “मी त्यांना..”

‘अजितदादांशी फोनवर शेवटचं बोलणं काय झालं होतं?’ प्रफुल्ल पटेल यांनी दिलं उत्तर, “मी त्यांना..”

 

अजित पवार यांचं २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झालं. सगळ्या महाराष्ट्रासाठी ही घटना धक्का देणारी ठरली. २९ जानेवारीला अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सगळ्या महाराष्ट्राने त्याना साश्रू नयनांनी निरोप दिला. दरम्यान अजित पवार यांच्या मृत्यूनंतर रोहित पवार यांनी १० फेब्रुवारी आणि १८ फेब्रुवारी अशा दोन दिवशी पत्रकार परिषद घेऊन प्रश्न उपस्थित केले. दरम्यान पूर्व विदर्भातल्या एका नेत्यासाठी अजित पवार थांबले होते. कारने बारामतीला जाणार होते, पण नंतर विमानाने जावं लागलं आणि अपघात झाला असे आरोप करण्यात आले. या आरोपांचा रोख हा प्रफुल्ल पटेल यांच्याकडे होता. इतर काही नेत्यांनीही हे म्हटलं होतं. त्यावर आता प्रफुल्ल पटेल यांनी उत्तर दिलं आहे.

अजित पवारांच्या अपघाताबाबत काय म्हटलं आहे प्रफुल्ल पटेल यांनी?

अजित पवारांचा अपघात झाला त्या दिवशी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री बारामतीला पोहचले. त्यांनी तपास करण्यासाठी एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इनव्हेस्टिगेशन ब्युरो AAIB या संस्थेला सूचना केली. काही दिवसांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडी चौकशी होईल असंही जाहीर केलं. सीबीआयसारख्या एजन्सीने या घटनेचा तपास केला पाहिजे त्यामुळे आम्ही ही मागणी केली होती असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.

अजितदादांचा माझा फोन शेतकऱ्यांबाबत होता-प्रफुल्ल पटेल

अजितदादांचा आणि माझा शेवटचा फोन हा मी दिल्लीहून केला होता. मला माहीत नव्हतं की ते कुठल्या शहरात आहेत. मी त्यांना हे लक्षात आणून दिलं होतं की पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांकडून शासनाने करायची धान खरेदी झाली आहे. त्याचे चुकारे बाकी आहेत, त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर निधी द्यावा अशी सूचना मी अजितदादांना केली होती. पुढची कारवाई काय केली मला माहीत नाही. राईस मिलची फाईल वगैरे सांगत आहेत ती चुकीची बाब आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना मी जनप्रतिनिधी या नात्याने फोन केला होता. माझ्यामुळे अजितदादा उशिरा गेले, त्यांना कारऐवजी विमानाने जावं लागलं हे सगळं लोक सांगत आहेत ही बाब दुर्दैवी आहे.

अपघाताचं सत्य समोर आलं पाहिजे ही आमचीही मागणी आहे-पटेल

अजित पवारांचा अपघाती मृत्यूचा आम्हालाही धक्का बसला आहे, राज्याला आणि देशाला धक्का बसला आहे. मात्र सामान्य माणसांच्या कामासाठी मी फोन केला त्याचा संबंध अपघाताशी जोडणं आणि अपप्रचार करणं खेदजनक आहे असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. भंडाऱ्यामधे त्यांनी ही भूमिका मांडली. अजित पवारांचा अपघात झाला, नेमकं काय झालं ते सत्य समोर आलं आहे. दादा गेल्यामुळे महाराष्ट्राचं आणि देशाचं नुकसान झालं पाहिजे. आमच्याकडून आम्ही सरकारकडे, यंत्रणांकडे पाठपुरावा करत आहोत असंही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.