बारामती येथील शेगर धनगर वधू-वर सूचक मेळाव्यात शेतकरी मुलांना चांगले दिवस येणार याची नांदी

बारामती येथील शेगर धनगर वधू-वर सूचक मेळाव्यात शेतकरी मुलांना चांगले दिवस येणार याची नांदी

 

बारामती: “मुलगी शेतीत मदत करणारी असावी, शिकलेली नसली तरी चालेल,” असे मत युवक गणेश आटोळे यांनी व्यक्त करताना, आपण डाळिंब पिकातून वर्षाला सुमारे ५० लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत असल्याची माहिती सभागृहात सांगितली. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून या विचारांचे स्वागत केले. शेतकरी मुला-मुलींसाठी चांगले दिवस येणार असल्याची ही सकारात्मक नांदी आज बारामती येथील शेगर धनगर वधू-वर सूचक मेळाव्यात पाहायला मिळाली.

याच वेळी काही महिलांनी पुढे येऊन, “मुलगा शेतकरी असला तरी चालेल,” असे स्पष्ट मत व्यक्त केले. या मतांमुळे शेतकरी समाजाबद्दल बदलत असलेली मानसिकता आणि शेतीकडे पुन्हा एकदा सन्मानाने पाहिले जात असल्याची प्रचिती उपस्थितांना आली.

महाराष्ट्र राज्य शेगर धनगर महासंघ व शेगर धनगर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेगर धनगर वधू-वर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे कार्याध्यक्ष श्री. भारत बापू गावडे हे होते. यावेळी महासंघाचे अध्यक्ष श्री. सुनील भगत, माजी अध्यक्ष अँड. जी. बी. गावडे, शेगर धनगर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. अजय गाढवे, श्री. दशरथ आबा राऊत, श्री. दत्तात्रय माळशिकारे, श्री. सोपान आटोळे, श्री. किसनराव आटोळे, माजी उपआयुक्त श्री. हनुमंत नाझीरकर, दूध संघाचे माजी अध्यक्ष श्री. पोपटराव गावडे, श्रीमती निर्मलाताई अनंता रोटे, श्री. महादेव गावडे, श्री. जायपत्रे सर, श्री. निळकंठ आटोळे, श्री. नानाभाऊ पंखुले, श्री. सोपानराव तुळशिराम आटोळे, श्री. रामदासभाऊ बिबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या मेळाव्यात ऑनलाईन व प्रत्यक्ष नोंदणी केलेले जवळपास २४० वधू-वर उपस्थित होते. तसेच पालक वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित राहिला होता. कार्यक्रमात दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, पुस्तके व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी समाजातील दानशूर व्यक्ती व उद्योजक श्री. सुनील येडे, माजी प्राचार्य श्री. शिवाजी गावडे, कारखाना संचालक श्री. राजेंद्र गावडे, श्री. बाळासाहेब गावडे, श्री. सुनील तात्या भगत तसेच श्री. दत्तकृपा नागरी सहकारी पतसंस्था यांचे विशेष सहकार्य लाभले.

यावेळी वधू-वरांचे बायोडाटा वाचन शेगर धनगर फाउंडेशनचे सचिव प्रा. संभाजी साबळे सर व डॉ. सरोजनी सतीश खोमणे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासंघाचे अध्यक्ष श्री. सुनील तात्या भगत यांनी केले. सूत्रसंचालन श्री. अमोल धापटे यांनी तर आभार प्रदर्शन महासंघाचे सचिव प्रा. शिवलाल गावडे सर यांनी केले.

या मेळाव्यामुळे शेगर धनगर समाजात विवाहविषयक सकारात्मक बदल घडून येत असून शेतकरी युवकांना नवी दिशा व आत्मविश्वास मिळत असल्याचे चित्र दिसून आले.