'कामाचा माणूस' उपक्रमा अंतर्गत अजितदादांच्या आठवणी संकलित करण्यासाठी छायाचित्रे आणि चित्रफिती पाठवण्याचं आवाहन
बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपूर्ण राज्यात ‘कामाचा माणूस’ म्हणून ओळख निर्माण केली होती. त्यांच्या ४० वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत अनेक आठवणी आहेत. छायाचिते आणि चित्रफितींच्या माध्यमातील या आठवणी आता ‘कामाचा माणूस’ उपक्रमांतर्गत संकलित केल्या जाणार आहेत. अजितदादांच्या कार्याचा समृद्ध दस्तऐवज तयार करण्यासाठी अजितदादांशी संबंधित छायाचित्रे किंवा चित्रफिती पाठवण्याचे आवाहन विशेष कार्य अधिकारी सुनील मुसळे यांनी केलं आहे.
सुनील मुसळे यांनी याबाबत एक पत्र प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये ते म्हणतात, महाराष्ट्राच्या राजकारणात “कामाचा माणूस” म्हणून ज्यांनी आपल्या कार्याचा अथक ठसा उमटवला, असे आदरणीय अजितदादा पवार यांच्या जीवनातील अमूल्य क्षण आपण छायाचित्रे आणि चित्रफितीच्या माध्यमातून जतन करण्याचा एक भावपूर्ण उपक्रम हाती घेत आहोत.
गेल्या चार दशकांहून अधिक काळ आदरणीय दादांनी राजकीय आणि सामाजिक जीवनात अखंड परीश्रम केले. सकाळी लवकरात लवकरपासून सुरू होणारे त्यांचे कामकाज, धडपड, रात्री उशिरापर्यंत अखंड सुरू असायचे. कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे नाते, विकासासाठीची तळमळ आणि जनतेसाठीची बांधिलकी या सर्वांना शाश्वत इतिहासात स्थान मिळावे, ही या प्रकल्पामागील भावना आहे.
आदरणीय दादांच्या कार्यकर्त्यांकडे, सहकाऱ्यांकडे, स्नेहीजनांकडे व मित्रमंडळींकडे त्यांच्या जीवन प्रवासातील अनेक अमूल्य क्षण छायाचित्रे किंवा चित्रफितींच्या स्वरूपात जतन केले असतील. आपणाकडे उपलब्ध असलेली अशी छायाचित्रे व व्हिडिओज (एव्ही फुटेज) कृपया उपलब्ध करून द्यावीत, ही नम्र विनंती. यासाठी स्वतंत्र ई-मेल आयडी ourdada@viitindia.org आणि प्रकल्पाचे प्रभारी संपर्क ८८७९८८७००९ (श्री. अभिषेक) उपलब्ध करून देण्यात येत आहे.
या उपक्रमामुळे आदरणीय दादांच्या कार्याचा समृद्ध दस्तऐवज तयार होईल. राज्यातील तसेच राज्याबाहेरील त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस त्यांच्या आठवणी पुन्हा अनुभवता येतील. त्यांची स्मृती चिरंतन राहाव्यात आणि पुढील पिढ्यांपर्यंत त्यांच्या कार्याची प्रेरणादायी वारसा पोहोचावा, यासाठी आपला सहकार्य अत्यंत महत्त्वाचा आहे. चला, आपण सर्वजण मिळून आदरणीय दादांच्या आठवणी जतन करूया आणि त्यांच्या स्मृतींना चिरकाल जिवंत ठेवूया असं आवाहन सुनील मुसळे यांनी केलं आहे.