बारामतीमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीची शक्यता, विशेष मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर
बारामती: बारामती विधानसभा मतदारसंघातील रिक्त जागा भरण्यासाठी येत्या काही दिवसांमध्ये विधानसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार मतदारयादी अद्ययावत, अचूक आणि पारदर्शक राहावी यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून, हा कार्यक्रम १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित आहे. त्यानुसार एकत्रित प्रारूप मतदारयादी आज, सोमवारी (९ फेब्रुवार) प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर २५ फेब्रुवारीपर्यंत मतदारांकडून दावे आणि हरकती स्वीकारल्या जाणार आहेत.
मतदारांनी त्यांचे नाव प्रारूप मतदार यादीमध्ये आहे की नाही, याची तपासणी करावी. नाव नसल्यास अर्ज क्रमांक ६ भरून मतदार यादीत नाव नोंदवावे. तसेच नावामध्ये किंवा मतदार यादीतील तपशीलामध्ये दुरुस्ती आवश्यक असल्यास अर्ज क्रमांक ८ भरावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
प्राप्त दावे आणि हरकतींची छाननी करून हरकती ६ मार्चपर्यंत निकाली काढण्यात येणार आहेत. अंतिम मतदारयादी दहा मार्च रोजी जाहीर केली जाणार आहे. या प्रक्रियेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच मतदान केंद्रांची यादी तयार करताना स्थानिक स्तरावर सुसूत्रता राखण्यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच बारामती मतदार नोंदणी अधिकारी यांच्या स्तरावर मान्यता प्राप्त राजकीय पक्षांबरोबर बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीत राजकीय पक्षांना कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्यात येऊन आवश्यक सूचना करण्यात येणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.