'अजित दादा म्हणाले होते, छगन भुजबळ राज्यसभेवर जातील', अमोल कोल्हे यांचा गौप्यस्फोट
पुणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या विलीनीकरणाचा विषय चर्चेत आला. विविध नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यात आल्या. राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी या चर्चा फेटाळल्या. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी विलीनीकरणावर अजित पवार यांच्यासोबत चर्चा झाल्याचा दावा केला. पण आता त्या चर्चांना काही अर्थ नसल्याचंदेखील म्हटलं. खासदार अमोल कोल्हे यांनीदेखील अजित पवार यांच्यासोबत विलीनीकरणाबाबत 14 बैठका झाल्याचं म्हटलं होतं. पण त्या चर्चांना आता काय महत्त्व राहिलं? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांनी विलीनीकरणासाठी घाई नको, असं वक्तव्य केलं आहे. यानंतर अमोल कोल्हे यांना छगन भुजबळ यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता, कोल्हे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
"छगन भुजबळ हे फार मोठे नेते आहेत आणि मी त्यांचा त्रागा समजू शकतो. कारण जी काही आधी चर्चा झाली होती, आता विशेषत: जातनिहाय जनगणना होत असताना, ओबीसीचा कॉलम जातनिहाय जनगणनेत नसताना, छगन भुजबळ यांच्यासारखे वरिष्ठ नेते संसंदेत असणं ही फार महत्त्वाची गोष्ट होती. आमच्यात जी काही प्राथमिक चर्चा झाली होती त्यामध्ये अजित दादांनी एकदा आम्हाला ओघाने सांगितलं होतं की, कदाचित छगन भुजबळ हे राज्यसभेवर असतील, अशी एक चर्चा आमची अंतर्गत झाली होती", असा गौप्यस्फोट अमोल कोल्हे यांनी केला आहे.
"आता मात्र इतक्या सामाजिक प्रश्नाची जाण असणारा नेता न जाता, कोट्यावधी रुपये घेऊन निवडणूक रणनीती विकणारी व्यक्ती राज्यसभेवर जाण्याची चर्चा येत असेल तर त्यामुळे कदाचित छगन भुजबळ हे अस्वस्थ असतील. मला कल्पना नाही. हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना या चर्चेत का घेतलं नाही? हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. त्यामुळे त्या विषयी मी उगाच भाष्य करणं योग्य नाही", असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.