अकोल्यात काँग्रेस आमदाराला १० कोटीची डिमांड, पोलिस प्रशासनाची चुप्पी
मिळालेल्या माहितीनुसार, १७ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे ३ वाजता आमदार पठाण यांना धमकीचा फोन आला. “दोन दिवसांत १० कोटी रुपये दे, नाहीतर दोन दिवसांत तुझा गेम करू,” असा इशारा देण्यात आला. हा कॉल अमेरिकेतील कॅलिफोर्नियावरून आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. धमकीनंतर आमदार पठाण यांची सुरक्षा वाढवण्यात आली असून चार शस्त्रधारी पोलीस त्यांच्या संरक्षणासाठी तैनात करण्यात आले आहेत. या प्रकरणानंतर आमदार पठाण यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांची भेट घेऊन तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तपासाची दिशा ठरवण्यात आली असून संपूर्ण प्रकरण अत्यंत गोपनीयतेने हाताळले जात आहे. धमकी देणारा व्यक्ती म्हणजे बिश्नोई गँगशी संबंधित शुभम लोणकर असल्याचे सांगितले जात आहे.
तो मूळ अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील रहिवासी असून पूर्वीही शस्त्र तस्करी प्रकरणात त्याच्यावर कारवाई झाली होती. पोलिसांनी त्याच्याकडून पिस्टल आणि जिवंत काडतुसे जप्त केली होती. लोणकर हा कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात असल्याचे तपासात समोर आले होते. त्याचे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्क असल्याचाही संशय आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा तसेच चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेशीही त्याचे नाव जोडले गेले होते.
सलग दोन आमदारांना धमक्या मिळाल्याने जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही टीका होत आहे. अकोल्यात गुन्हेगारीचा प्रभाव एवढा वाढला आहे की आता लोकप्रतिनिधीही निशाण्यावर येत असल्याने प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.