टिपू सुलतानप्रकरणावर मनसेने जाहीर केली अधिकृत भूमिका
मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्यानंतर राज्यभरात वातावरण तापलं आहे. सपकाळ यांच्या वक्तव्यानंतर भाजपाचे कार्यकर्ते राज्यभरात आंदोलन करत आहेत. या अनुषंगाने आज पुण्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यानंतर मोठा राडाही झाला. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून याबाबत पोस्ट करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मालेगाव महानगरपालिकेतील उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या दालनात टिपू सुलतान यांचे छायाचित्र लावण्यात आला. यामुळे यावरून वाद सुरू झाला. त्यातच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या वादात उडी घेतल्याने हा वाद पुन्हा उफाळून आल्याचे दिसत आहे. सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सपकाळ यांच्या विधानाचा निषेध म्हणून मालेगावात भाजपने रविवारी दुपारी आक्रमक पवित्रा घेत सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारले आणि त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन देखील केले.
हर्षवर्षन सपकाळ काय म्हणाल होते?
हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं की, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांच्या शौर्याप्रमाणेच, त्याच मांदियाळीत टिपू सुलतान आहेत. टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरोधात लढा पुकारला होता. टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे एक योद्धे होते. ते भारताचे भूमिपूत्र होते. त्यांनी कधीही विषारी, विखारी विचारांना जवळ केलं नाही. ते एक शौर्याचं लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे”, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं होतं.
मनसेची भूमिका काय?
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानाशी केली. ही अत्यंत निंदनीय बाब आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचा तीव्र निषेध नोंदवत आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राची आणि शिवप्रेमींची जाहीर माफी मागावी”, असं मनसेने म्हटलं आहे.
मनसेने यासंदर्भात एक्सवर पोस्ट करून त्यांची भूमिका जाहीर केली.