अजित पवारांबरोबर अपघातात मृत्यू झालेल्या विदीप जाधवांचा विमा मंजूर

अजित पवारांबरोबर अपघातात मृत्यू झालेल्या विदीप जाधवांचा विमा मंजूर

 

बारामती: २८ जानेवारी रोजी बारामतीमध्ये विमान कोसळून उपमुख्यमंत्री अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. यात अजित पवारांचे पीएसओ विदीप जाधव यांचाही समावेश आहे.

मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले विदीप जाधव यांच्या अपघाती मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला. २००९ मध्ये मुंबई पोलीस दलात विदीप जाधव हे कॉन्स्टेबल म्हणून रूजू झाले होते.

२०१४ ते २०१९ या काळात ते तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा पथकामध्ये होते. २०१९ पासून ते अजित पवार यांचे पीएसओ म्हणून कार्यरत होते. पण, २८ जानेवारी रोजी अजित पवारांसोबत बारामतीत पोहचण्यापूर्वीच विमान कोसळले. त्यात अजित पवार, विदीप जाधव आणि इतर तिघांचा मृत्यू झाला.

विदीप जाधव यांनी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचा अपघात विमा घेतलेला होता. अपघातात त्यांचा मृत्यू झाल्यानंतर लागणारी सगळी कागदपत्रे आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर त्यांचा १ कोटी ५ लाख रुपयांचा विमा मंजूर करण्यात आला. ही रक्कम जाधव यांच्या कुटुंबीयांना मोठा आधार ठरणार आहे.

विदीप जाधव यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात आहे. ते तरडगावचे रहिवाशी होते. पण, मुंबई पोलीस दलात नोकरी सुरू केल्यानंतर ते कुटुंबासह ठाणे जिल्ह्यातील कळवा येथे राहत होते. त्यांना १३ वर्षांची मुली आहे आणि ९ वर्षाचा मुलगा आहे. नेत्रा असे त्यांच्या मुलीचे नाव आहे, तर अव्दित असे मुलाचे नाव आहे.