महाराष्ट्रामुळे भाजपाचं राज्यसभेतलं संख्याबळ वाढणार; ७ जागांसाठी बिनविरोध निवडणूक होणार?
मुंबई - येत्या एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातील ७ राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यात शरद पवारांचाही समावेश आहे. राज्यातील विधिमंडळाचे संख्याबळ पाहता महायुतीचे अधिक खासदार राज्यसभेत जातील. त्यात भाजपाचे ४, राष्ट्रवादी १, शिंदेसेना १ आणि महाविकास आघाडीच्या वाट्याला १ जागा येण्याची शक्यता आहे. राज्यसभेतील निवडीसाठी उमेदवाराला ३७.५ मतांची गरज आहे. विधानसभेत महाविकास आघाडीची ताकद कमी झाल्याने यावेळी मविआच्या ३ जागा महायुतीच्या पारड्यात गेल्या आहेत.
राज्यात २०२४ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात महायुतीला जबरदस्त यश मिळाले. या निकालात भाजपाचे सर्वाधिक १३७ आमदार निवडून आले तर शिंदेसेनेच्या ६० आणि राष्ट्रवादीच्या ४१ जागा निवडून आल्या. या निकालात उद्धवसेना २०, काँग्रेस १६ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला १० जागांवर समाधान मानावे लागले. मात्र याचा परिणाम एप्रिल महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीवर होणार आहे. संख्याबळ पाहता ७ जागांपैकी ६ जागा महायुतीला मिळतील तर १ जागा महाविकास आघाडीला मिळू शकते.
"शरद पवारांसारखा नेता दिल्लीत असणं गरजेचे"
तर शरद पवारांसारखा नेता महाराष्ट्रासाठी दिल्लीत असणे गरजेचे आहे. आता थांबायला पाहिजे अशी पवारांची मानसिकता आहे परंतु आम्ही त्यांचे चाहते आहोत, ते आमचे मार्गदर्शक आहेत. मात्र त्यांच्यासारख्या नेत्याने दिल्लीत असणे म्हणजे ते महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहेत. आमच्याकडे पुरेशी मते आहेत. कुणाकडे हात पसरण्याची गरज नाही. शरद पवारांनी निवडणुकीला उभे राहावे ही आमची इच्छा आहे. पवारांना निवडून आणण्याची ताकद महाविकास आघाडीकडे आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान त्यांच्याभोवती आहेत. त्यांनी निवडणुकीत उभे राहावे असं संजय राऊत यांनी म्हटलं.
राज्यसभेत कोणाचा कार्यकाळ संपणार?
दरम्यान, महाराष्ट्रात राज्यसभेच्या एकूण १९ जागा आहेत. त्यातील १२ जागा एनडीए आणि ७ जागा महाविकास आघाडीकडे आहेत. त्यातील शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीकडे एकूण २ जागा आहेत. त्यात शरद पवार, फौजिया खान या राज्यसभा सदस्या आहेत. या दोघांचा कार्यकाळ येत्या २ एप्रिल २०२६ पर्यंत आहे. ठाकरे गटाच्या प्रियंका चर्तुवैदी यांचाही कार्यकाळ २ एप्रिलला संपणार आहे. काँग्रेसचे रजनी पाटील, भाजपाचे धैर्यशील पाटील, भागवत कराड यांचीही मुदत संपणार आहे. रामदास आठवले यांचीही मुदत २ एप्रिलला पूर्ण होत आहे.